पारनेरचे आमदार काशिनाथ दाते यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर पावसाळी अधिवेशनात उठवला आवाज

Published on -

आमदार काशिनाथ दाते यांनी राज्य विधिमंडळात शेतकऱ्यांना सातत्याने भेडसावणाऱ्या समस्यांकडे शासनाचे लक्ष वेधत धोरणात्मक निर्णय घेण्याची ठाम मागणी केली आहे. शुक्रवार (दि. ४) जुलै रोजी पावसाळी अधिवेशनात नियम २९३ अन्वय झालेल्या चर्चेत सहभागी होताना त्यांनी आपल्या भाषणातून शेतकऱ्यांच्या व्यथांची अभ्यासपूर्वक मांडणी केली.

आ. दाते म्हणाले, ‘शेतकरी हा पूर्णपणे निसर्गावर आणि शेतीवर अवलंबून आहे. मात्र, गेल्या काही वर्षांत निसर्ग चक्रामध्ये कमालीचे बदल झाले आहेत. यावर्षीही याचा प्रत्यय आला असून, अहिल्यानगर जिल्ह्यात मे महिन्यातच सरासरीच्या दुप्पट पाऊस झाला. पारनेर-नगर मतदारसंघातील सुपा-शहांजापुरपासून ते खडकी खंडाळा परिसरात तर अतिशय संहारक अतिवृष्टी झाली.

शेती, रस्ते, जलाशय आणि नागरी सुविधांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. खराब बियाण्यांमुळे शेतकऱ्यांना बसलेला आर्थिक फटका अधोरेखित करताना दाते म्हणाले की, ‘काही कंपन्यांनी टाकळी ढोकेश्वर परिसरात कृषी सेवा केंद्रांच्या माध्यमातून बोगस बियाणे विक्री केली. त्यामुळे बाजरीच्या पेरणीनंतरही उगवण न झाल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले.

याशिवाय पारनेरच्या पठार भागात नगदी पीक म्हणून वाटाणा हे पिक घेतले जाते. मात्र, सततच्या अतिवृष्टीमुळे हे पीक पूर्णतः उद्ध्वस्त झाले आहे, त्यामुळे दुबार पेरणीचे संकट उभे ठाकले आहे. याच अनुषंगाने सौरऊर्जेच्या अनुदानित पंप योजनेंतर्गत ठेकेदार आणि महावितरणच्या टाळाटाळीमुळे निर्माण झालेल्या अडचणींवरही दाते यांनी प्रहार केला.

ते म्हणाले, ‘मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ही योजना अतिशय चांगली व शेतकरी हिताची आहे, मात्र प्रत्यक्ष अंमलबजावणीमध्ये ठेकेदारांची आणि महावितरणची उदासीनता असल्याने शेतकऱ्यांना अपेक्षित लाभ मिळत नाही.

आरडीएसएस योजनेतील ठेकेदाराच्या हलगर्जीपणावर तीव्र शब्दांत टीका करताना त्यांनी सांगितले की, ‘अहिल्यानगर जिल्ह्यातील ३५० कोटींची योजना परराज्यातील ठेकेदाराच्या गलथान कारभारामुळे ठप्प झाली आहे. याचा फटका थेट शेतकऱ्यांना बसत आहे. हमीभावाच्या संदर्भातही त्यांनी ‘कांद्याच्या विक्री प्रक्रियेत अनेक बाजार समित्यांमध्ये व्यापाऱ्यांची मक्तेदारी आहे.

नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीप्रमाणेच राज्यभरात लिलाव प्रक्रिया बाजार समितीच्या कर्मचाऱ्यांच्या नियंत्रणाखाली राबवली गेल्यास शेतकऱ्यांना योग्य भाव मिळेल,’ असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

नैसर्गिक आणि मानवनिर्मित कारणांमुळे शेतकरी संकटात आहे, त्यामुळे या सर्व समस्यांवर ठोस आणि धोरणात्मक निर्णय घेण्याची गरज आहे, ‘शेतकऱ्यांच्या जीवनात स्थैर्य निर्माण करणाऱ्या उपाययोजनांची गरज आहे. यावर शासनाने गांभीर्याने विचार करावा. – काशिनाथ दाते (विधानसभा सदस्य)

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!