समृद्धी महामार्गाला अवघ्या दोन महिन्यातच पडल्या भेंगा, २० वर्षे खड्डाच पडत नसल्याचा दावा ठरला खोटा

Published on -

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग वाहतुकीसाठी पूर्णतः खुला होऊन अवघे दोन महिने झाले असतानाच महामार्गावर भेगा पडल्याचे समोर आले आहे. या महामार्गासाठी एमएसआरडीसीने एम-४० ग्रेडचे सिमेंट वापरल्याचा दावा केला होता. या सिमेंटने २० वर्षे खड्डे पडत नाहीत, असा दावाही त्यांनी केला होता. मात्र कोपरगावजवळील चांदेकसारे येथे भेगा पडल्याने तो दावा फोल ठरल्याचे स्पष्ट झाले आहे.

चांदेकसारे गावाजवळील किलोमीटर क्रमांक ५२७.३ या ठिकाणी सात ते आठ ठिकाणी मोठे तडे गेले आहेत. सुमारे २० ते ३० फूट लांब आणि १ ते १.५ सेंटीमीटर रुंद अशा आडव्या भेगा या ठिकाणी पडल्या असून काही तड्यांची खोली ३ ते ४ इंचांपर्यंत गेलेली आहे.

सिमेंट रस्त्यावर आडव्या भेगा लवकर दुरुस्त होतात, मात्र या तडे गुणवत्तेच्या दृष्टीने गंभीर मानले जातात. या भागात काँक्रीट बसवलेले असून त्याखाली मातीचा भराव आहे. बॅरिकेटच्या बाजूला असलेल्या लेनमध्ये मोठे तडे गेल्यामुळे संपूर्ण न लेनवर खड्डा पडल्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. या परिस्थितीमुळे न एमएसआरडीसीचा २० वर्ष टिकावू न सिमेंटचा दावा धुळीस मिळाला आहे.

महाराष्ट्र बिल्डर असोसिएशन ऑफ इंडियाचे माजी अध्यक्ष अनिल सोनवणे यांनी याठिकाणी पाहणी केली. त्यांनी सांगितले की, आम्ही या – ठिकाणी थांबून पाहणी केली असता बॅरिकेट्स जवळच्या लेनमध्ये विविध ठिकाणी सात ते आठ ठिकाणी तडे गेलेले दिसून आले. त्यातील काही तडे तीन ते चार इंच खोल असून दोन ते तीन इंच रुंद आहेत.

याबाबत समृद्धी महामार्ग प्राधिकरणाने तातडीने लक्ष देणे आवश्यक आहे. अन्यथा मोठी जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येणार नाही. शिर्डी ते भरवीर या ७० किलोमीटर अंतराच्या टप्याचे उद्घाटन २६ मे २०२३ रोजी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले होते. याच टप्प्यात भेगा पडल्याने महामार्गाच्या कामाचा दर्जा उघड झाला आहे.

प्रकल्पाची माहिती

समृद्धी महामार्गाची एकूण लांबी ७०१ किलोमीटर असून यापैकी ६२५ किलोमीटरचा टप्पा वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. हा सुमारे ५५ हजार कोटी रुपये खर्चाचा प्रकल्प आहे. २०१९ मध्ये या महामार्गाचे काम सुरू झाले. ११ डिसेंबर २०२२ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नागपूर ते शिर्डी या ५२० किलोमीटर अंतराच्या टप्प्याचे उद्घाटन झाले. त्यानंतर शिर्डी ते भरवीर टप्पा २६ मे २०२३ रोजी, भरवीर ते इगतपुरी टप्पा मार्च २०२४ मध्ये, तर आमणेपर्यंतचा ७६ किलोमीटरचा टप्पा ५ जून २०२५ रोजी सुरू करण्यात आला.

निकृष्ट कामामुळे तडे पडल्याचा संशय

रस्त्याचा मातीचा भराव योग्य पद्धतीने न केल्यास किंवा रस्ता तयार झाल्यानंतर क्युरिंग व्यवस्थित न केल्यास अशा भेगा पडतात. तसेच निकृष्ट दर्जाचा पॅच वापरल्याससुद्धा अशा प्रकारची स्थिती उद्भवते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!