राहुरी- उसने दिलेले पैसे परत मागितल्याच्या कारणावरून युवकावर चाकूने हल्ला करून जिवे मारण्याची धमकी दिल्याची धक्कादायक घटना ५ जुलै रोजी सायंकाळी राहुरी तालुक्यातील वाघाचा आखाडा परिसरात घडली. या प्रकरणी अक्षय विजय तनपुरे याच्याविरुद्ध राहुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलीस सूत्रांकडून समजलेली माहिती अशी, की अंकित सुरेश धसाळ, वय २७, हे राहुरी तालुक्यातील वाघाचा आखाडा येथे राहतात. त्यांची अक्षय तनपुरे याच्याशी गेली दहा वर्षे मैत्री आहे. अंकित यांनी आठ महिन्यांपूर्वी तनपुरे यास १५ हजार रुपये उसने दिले होते. ५ जुलै २०२५ रोजी सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास अंकित धसाळ हे वाघाचा आखाडा ते येवले आखाडा रस्त्यावर
मित्रांसोबत गप्पा मारत असताना अक्षय तनपुरे तेथे आला.

त्यावेळी अंकित यांनी तनपुरे याच्याकडे उसने दिलेले पैसे मागितले. या गोष्टीचा राग आल्याने तनपुरे याने अंकित यांना शिवीगाळ केली आणि गाडीच्या चावीत बसवलेल्या चाकूने हल्ला करत जखमी केले. त्यानंतर “माझ्या नादी लागला तर तुला जिवंत सोडणार नाही” अशी धमकीही दिली.
या घटनेनंतर अंकित धसाळ यांनी राहुरी पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली. या फिर्यादीवरून अक्षय विजय तनपुरे, रा. पिंपळाचा मळा, ता. राहुरी याच्यावर गुन्हा रजि. नं. ७५१/२०२५ नुसार भारतीय न्याय संहिता कलम ११८ (१), ३५१ (२), ३५२ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.