अहमदनगर Live24 टीम, 02 जानेवारी 2022 :-  कंटेनरवर पाठीमागून भरधाव वेगाने येणारी कार धडकली. यामध्ये कारचा पुढील भाग चेपला गेला. या अपघातात दोन जण जागीच ठार झाले असून तिघे जखमी झाले आहेत. त्यातील दोघांची प्रकृती चिंताजनक आहे.

अहमदनगर-पुणे महामार्गावर नेवासा फाटा येथे आज (रविवार) पहाटे हा अपघात झाला. अपघातात कारमधील गजेंद्र रुपचंद कोलते (वय 65 रा. वाघोदे, ता.रावेर जिल्हा जळगाव) व आकाश प्रकाश सांगेले (वय 28 रा. थोरगव्हाण, ता.रावेर, जि.जळगाव) हे जागीच ठार झाले.

तर कल्पेश विनोदचंद पाटील (वय 35), भूमिका कल्पेश पाटील (वय 6, रा वलसाड, गुजरात) व सुलभा गजेंद्र कोलते (वय 55) हे तिघे जखमी झाले आहेत. रावेरमधून कोलते व सांगेले कुटुंबीय पुण्यातील भाच्याच्या घरी सत्यनारायणाची पूजा असल्याने पुण्याला निघाले होते.

औरंगाबाद-पुणे महामार्गावरून जात असताना रविवारी पहाटे नेवासा फाटा येथे त्यांच्या कारला अपघात झाला. नेवासा फाटा येथील चौकात नव्याने गतिरोधक बसवण्यात आला आहे.

त्याचा अंदाज न आल्याने जवळ आल्यावर वाहने अचानक थांबवली जातात. अशाच पद्धतीने अचानक थांबलेल्या कंटेनरवर पाठीमागून भरधाव वेगाने येणारी कार धडकली. दरम्यान, अपघताची माहिती मिळाल्यानंतर नेवासा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्य केले.