AhmednagarLive24 : तालुक्यातील देवराई येथे सेवा सोसायटीच्या निवडणुकीचा निकाल लागताच झालेल्या वादामध्ये एका युवकाचा खून झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान या मारहाणीत अन्य तीन जण जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. अजय पालवे असे मयत झालेल्या युवकाचे नाव आहे.

आज (शनिवार) सायंकाळी देवराई सेवा सोसायटीचे मतदान होऊन सायंकाळी निकाल लागला. यामध्ये सत्ताधारी गटाला ११ जागा मिळाल्या तर विरोधी गटाला दोन जागा मिळाल्या. निवडणूक निकालानंतर विजय गटाने गुलाल उधळत आनंदोत्सव साजरा केला.

त्यानंतर दोन गटात वाद झाले. यामध्ये चार चौघांवर तलवारीने वार झाल्याने दोघांना उपचारासाठी नगरला हलविण्यात आले, त्यापैकी एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची माहिती समजल्यानंतर गावातील वातावरण तणावपूर्ण बनले व ग्रामस्थांनी रस्त्यावर येऊन आंदोलन सुरू केले. आरोपींना तात्काळ अटक करण्याची मागणी पोलिसांकडे केली.

सुमारे दोन तास या ठिकाणी ग्रामस्थांनी महामार्ग रोखुन धरला होता. यावेळी स्थानिक गुन्हे शाखा, पाथर्डी, शेवगावचे पोलीस अधिकारी व कर्मचारी देखील उपस्थित होते. देवराईत निवडणुकीच्या कारणावरून झालेल्या हाणामारीत अजय गोरख पालवे, विष्णू कैलास पालवे, मनोहर नवनाथ पालवे, वैभव कैलास पालवे, सुमन नवनाथ पालवे यांना तलवारीने मारहाण झालेली आहे.

यामध्ये अजय गोरख पालवे यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची माहिती समजली आहे. त्यामुळे देवराई येथील वातावरण तणावपूर्ण बनले असून पोलीस आरोपींच्या शोधासाठी रवाना झाले आहेत.