पारनेर तालुक्यातून एक वाईट बातमी नुकतीच समोर आली आहे,पारनेर नगरपंचायतीच्या मावळत्या नगरसेविका नंदाताई साहेबराव देशमाने यांचे पती साहेबराव देशमाने

यांचे पारनेर – सुपे रस्त्यावर सोमवारी सायंकाळी सव्वासात वाजण्याच्या सुमारास झालेल्या अपघातात दुर्दवी निधन झाले. अतिशय शांत, संयमी, कष्टाळू असलेल्या साहेबराव यांच्या या अकाली निधनाने पारनेरकर हळहळले आहेत.

याबाबत सविस्तर वृत्त असे कि साहेबराव पिंपळगांवकौडा ता. नगर येथून दुचाकीवरून पारनेकडे परतत होते. पारनेरला पोहचण्यास अवघ्या दिड किलोमिटरचे अंतर शिल्लक राहिलेले असताना शाहीर भास्कर गायकवाड यांच्या वस्तीजवळ त्यांच्या दुचाकीस भिषण अपघात झाला.

समोरून येणाऱ्या दुचाकीस्वाराने त्यांच्या दुचाकीस जोराची धडक दिल्याने झालेल्या भिषण अपघातात साहेबराव यांच्या डोक्यास गंभीर जखम झाली. त्यातच त्यांचे दुर्देवी निधन झाल्याची प्राथमिक माहीती आहे.

मिळालेल्या माहीतीनुसार अपघातानंतर परीसरातील नागरीकांना साहेबराव यांना तात्काळ पारनेरच्या ग्रामिण रूग्णालयात दाखल केले. मात्र उपचार सुरू करण्यापूर्वीच त्यांचे दुर्देवी निधन झाल्याचे वैद्यकिय अधिकाऱ्यांनी जाहिर केले.

कामावर प्रचंड श्रध्दा असलेल्या, जनतेच्या प्रश्‍नांसाठी नेहमीच प्रामाणिक प्रयत्न करणाऱ्या साहेबराव यांच्या अशा अकाली व अपघाती निधनाने पारनेरकर हळहळले आहेत.