file photo

अहमदनगर Live24 टीम, 08 डिसेंबर 2021 :- अल्पवयीन मुलीच्या अंगातील भूत काढून देण्यासाठी होमा समोर कोंबडी कापून भूतबाधा काढण्यासाठीचा अंधश्रद्धेचा प्रकार घडला आहे.

ही भूतबाधा काढण्यासाठी आठ हजार रुपये घेतले, तसेच आपली अंधश्रद्धेच्या नावाखाली लूट झाल्याचे लक्षात आल्यानंतर तक्रादारांनी पैसे परत मागितले असता त्यांना मारहाण केली.

अहमदनगर शहराच्या सावेडी उपनगरातील वैदूवाडीमध्ये १८ नोव्हेंबरच्या रात्री घडलेल्या या घटनेची फिर्याद मंगळवार, ७ डिसेंबरला दाखल झाली आहे.

अल्पवयीन मुलीने तोफखाना पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून अविनाश धनगर, आरती अविनाश धनगर (रा. वैदूवाडी, भिस्तबाग चौक), एक अनोळखी पुरुष (गुरू) (पत्ता माहिती नाही) अशा तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी अल्पवयीन मुलीच्या आईने आपली मुलगी सारखी फाशी घेण्याचा प्रयत्न करते म्हणून तीला आरोपींकडे नेले. तेंव्हा आरोपींनी मुलीच्या अंगात एका फाशी घेतलेल्या मुलीची भूतबाधा झाली असल्याचे सांगितले.

त्यावर तोडगा म्हणून होम करून कोंबडी कापण्यात आली, तसेच यासाठी आठ हजार रुपये घेण्यात आले. विधी करण्यासाठी एका मांत्रिकाला आणण्यात आले होते.

यानंतर आरोपींनी आता तुमच्या मुलीच्या अंगातील भूतबाधा नष्ट झाल्याचे सांगितले. याबाबत अंधश्रद्धेच्या नावाखाली आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्याने फिर्यादी मुलीच्या आईने आरोपींकडे दिलेले

पैसे परत मागितले असता त्यांना मारहाण करण्यात आली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. सहायक पोलीस निरीक्षक जे. सी. मुजावर पुढील तपास करत आहे