Ahmednagar Breaking :- जानेवारी महिन्यात नवीन राजकीय पक्षाची घोषणा केलेल्या माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्या पत्नी करुणा मुंडे यांची संगमनेरमधील तिघांनी तीस लाख रुपयांची फसवणूक केली आहे.

पक्षासाठी पैसे हवेत तर आमच्या बांधकाम कंपनीत गुंतवणूक करा, चांगला नफा मिळवून देतो, असे सांगून त्यांची फसवणूक करणाऱ्यात आली. यातील आरोपी धनंजय मुंडे यांच्या चांगल्या परिचयाचे असून पैसे परत मागितले असता त्यांनी धमक्या दिल्याचेही मुंडे यांनी फिर्यादीत म्हटले आहे.

संगमनेर पोलिसांनी शुक्रवारी रात्री गुन्हा दाखल केला आहे. आरोपी भारत संभाजी भोसले (रा. निमगाव जाळी, ता. संगमनेर), विद्या संतोष आभंग व प्रथमेश संतोष आभंग (दोघे रा.घुलेवाडी, ता. संगमनेर) या तिघांविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे.

मुंडे यांनी फिर्यादीत म्हटले आहे की, आरोपी भारत भोसले कामानिमित्त धनंजय मुंडे यांच्याकडे वारंवार येत होता. त्यावेळीत्याचा परिचय झाला होता.

जानेवारी २०२२ मध्ये आरोपी भारत, विद्या आभंग व प्रथमेश आभंग मुंबईला मुंडे यांच्या घरी आले होते. त्यानंतर त्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवून मुंडे यांनी आरोपींच्या लेवलसेट कन्स्ट्रक्शन प्रा.लि. या कंपनीसाठी ३० लाख रुपयांची गुंतवणूक केली.

नफ्यापोटी दरमहा ४५ ते ७० हजार रुपये देऊ, असे आरोपींनी सांगितले होते. नंतर फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर मुंडे यांनी पोलिस ठाणे गाठले.