अहमदनगर Live24 टीम, 22 ऑक्टोबर 2021 :- लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अटकेत असलेला मनपाचा मुख्य लेखाधिकारी प्रविण मानकर याच्या घरात साडेअकरा लाख रुपयांची रोकड, तब्बल ५४० ग्राम वजनाचे सोन्याच दागिने, तर दीड किलो वजनाच्या चांदीच्या वस्तू आढळल्या आहेत.

रोख रकमेबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केलेल्या चौकशीला मानकर याच्या पत्नीने समाधानकारक उत्तरे दिली नाही. एका ठेकेदारला धनादेश देण्यासाठी २० हजार रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी नगरच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मानकर याला बुधवारी दुपारी सापळा रचून ताब्यात घेतले.

त्याच्याविरुद्ध तोफखाना पोलिस ठाण्यात लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला. नंतर त्याला अटक करुन एक पथक त्याच्या घरझडतीसाठी रवाना करण्यात आले. तर गुरुवारी दुपारी तोफखाना पोलिसांनी प्रवीण मानकर (मूळ रा. फ्यांटसी, उत्तम टाऊन स्केप, विश्रांतवाडी) याला विशेष न्यायालयात हजर केले.

अधिक तपासाकरिता त्याला पोलिस कोठडी देण्याची मागणी करण्यात आली. न्यायालयाने मानकर याला शुक्रवारपर्यंत (२२ ऑक्टोबर) पोलिस कोठडी मंजूर केली आहे. मानकर याच्या पुण्यातील घरझडतीत साडेअकरा लाखांची रोकड, ५४० ग्रॅम सोन्याचे दागिने, दीड किलो चांदीच्या वस्तू, तीन फ्लॅटची कागदपत्रे मिळाली आहेत.

रोख रक्कमेबाबत मानकर याच्या पत्नीस विचारणा केली असता त्यांनी या कोणतेही वैध कारण दिले नाही. त्यामुळे ही रक्कम जप्त करण्यात आली. पुढील तपास पोलीस उपअधीक्षक हरिष खेडकर यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक पुष्पा निमसे करीत आहेत.