अहमदनगर Live24 टीम, 11 एप्रिल 2022 AhmednagarLive24 :- अहमदनगर शहरात सध्या पाणी पुरवठा विस्कळीत झाला आहे. त्यामुळे काही भागांत महापालिकेतर्फे टँकर पाठवून पाणीपुरवठा करण्यात येत आहे.

अशाच एका टँकरची बुरूडगाव रोडवरील एम.एस.ई.बी. कॉलनीतील ‘हिट अँड रन’ची घटना उघडकीस आली आहे. पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या कारचे आपोआप नुकसान कसे झाले? याची पाहणी करण्यासाठी नागरिकांनी सीसीटीव्ही फुटेज पाहिल्यावर ही घटना उघडकीस आली.

एम.एस.ई.बी. कॉलनीमध्ये पार्किंगमध्ये उभ्या मारुती स्विफ्ट कारची काच फुटली आणि दरवाजा तुटलेल्या अवस्थेत होता. कोणी तोडला किंवा कोणी धडक दिली, हे लक्षात आले नाही.

शेजारच्या लोकांनाही काही माहिती नव्हती. त्यामुळे सीसीटीव्हीमध्ये पाहिले असता ही घटना उघडकीस आली. दोन दिवस पाणी न सुटल्यामुळे चार एप्रिलला या कॉलनीत भर दुपारी महानगरपालिकेचा पाण्याचा टँकर आला होता.

तेथे चालक टँकर रिव्हर्स घेत असताना टँकरची कारला धडक बसल्याचे दिसून आले. मात्र, त्यावेळी या चालकाने कोणालाही काहीही न सांगता आपले काम केले आणि निघून गेला.

एवढेच नव्हे तर नागरिकांच्या हौदात पाणी सोडताना नेहमीप्रमाणेच जोरजोरात बोलून हुज्जतही घालत होता. टँकरसोबत चालक एकटाच होता. नियमाप्रमाणे त्याला मदतनीस नव्हता.

दुपारच्यावेळी कॉलनीत फक्त महिला असतात. शिवाय टँकर आल्याने पाणी भरून घेण्याच्या नादात या अपघाताकडे कोणाचे लक्ष गेले नाही.

चालकानेही खुबीने हा प्रकार लपविला. नागरिकांनी हे सीसीटीव्ही फुटेज प्रशासनाला दिले असून कारवाईची मागणी केली आहे.