Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यातील भाजपच्या काही पदाधिकाऱ्यांनी आज अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. हा कार्यक्रम पूर्वनियोजित असला तरी सध्याच्या राजकीय घडामोडीत लक्षवेधक ठरला आहे.

नगर तालुक्यातील जिल्हा परिषदेचे माजी सदस्य बाळासाहेब हराळ, अकोले तालुक्यातील कैलास वाकचौंरे व वसंतराव मनकर यांनी आज मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. एकीकडे भाजपकडून विधान परिषदेच्या निकालानंतरचा जल्लोष सुरू आहे.

शिवसेनेत एकनाथ शिंदे आणि समर्थंकांचे नाराजी नाट्य सुरू आहे. अशातच नगरच्या या भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.

यावेळी नगरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ, राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, अकोलेचे आमदार डॉ. किरण लहामटे, माजी आमदार राहुल जगताप, घनःश्याम शेलार, सीताराम गायकर, अशोक भांगरे, कपिल पवार, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके उपस्थित होते.भाजपचे ज्येष्ठ नेते विखे पाटील आणि मधुकर पिचड यांचे हे कार्यकर्ते असल्याने त्या दोघांनाही हा धक्का मनला जात आहे.