अहमदनगर Live24 टीम, 12 एप्रिल 2022 AhmednagarLive24 :-  नेवासा विधानसभा मतदारसंघातील भाजपचे माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांचे पुतणे, नेवासा पंचायत समितीतील भाजपचे माजी सदस्य अजित मुरकुटे यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे.

राज्याचे जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांच्या हस्ते मुरकुटे यांना शिवबंधन बांधण्यात आले. गेल्या काही काळापासून गडाख यांनी नेवासा तालुक्यात आक्रमकपणे शिवसेनेचा विस्तार सुरू केला आहे.

माजी आमदार मुरकुटे यांचा प्रभाव क्षेत्रातील अनेक कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. आता थेट मुरकुटे यांच्या पुतण्यानेच शिवसेना प्रवेश केल्याने मुरकुटे यांना हा धक्का मानला जात आहे.

अजित मुरकुटे हे नेवासा पंचायत समितीतील भाजपचे एकमेव सदस्य होते. तालुक्यात शिवसेनेची ताकद वाढत असल्याने आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीकडे लक्ष लागले आहे.

शिवसेनेत प्रवेश करताना अजित मुरकुटे यांनी माजी आमदार मुरकुटे यांच्यावर टीका केली आहे. काही दिवसांपासून मुरकुटे यांनी खालच्या पातळीचे राजकारण सुरू केले आहे.

याला कंटाळून आणि विकास कामांसाठी पाठबळ मिळावे यासाठी मंत्री गडाख यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत प्रवेश करीत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.