अहमदनगर Live24 टीम, 05 जानेवारी 2022 :-  राहुरी कारागृहातील आरोपी पळून गेल्याप्रकरणी राहुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र इंगळे यांना जबाबदार धरून त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.

जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी निरीक्षक इंगळे यांच्याविरोधातील कारवाई बाबतचा प्रस्ताव नाशिक परिक्षेत्राचे पोलीस उपमहानिरीक्षक डॉ. बी. जी. शेखर पाटील यांच्याकडे पाठविला होता.

यानंतर उपमहानिरीक्षक डॉ. शेखर पाटील यांनी निरीक्षक इंगळे यांच्या निलंबनाचा आदेश काढला आहे. दरम्यान यापूर्वी पोलीस उपनिरीक्षक तुषार धाकराव व पाच कर्मचार्‍यांचे निलंबन करण्यात आले आहे.

18 डिसेंबर 2021 च्या पहाटे राहुरी कारागृहाच्या खिडकीचे गज कापून मोक्का गुन्ह्यातील आरोपी सागर भांडसह पाच जणांनी पलायन केले होते. यातील तिघांना पकडण्यात पोलिसांना यश आले होते.

या घटनेनंतर खळबळ उडाली होती. आरोपींनी कारागृहातून पलायन केल्याने कारागृहाच्या सुरक्षेवर प्रश्‍न चिन्ह उपस्थित झाले.

या घटनेची माहिती मिळताच उपमहानिरीक्षक डॉ. शेखर पाटील, पोलीस अधीक्षक पाटील, अपर पोलीस अधीक्षक डॉ. दिपाली काळे यांनी घटनास्थळी भेट देवुन पाहणी केली.

याप्रकरणी उपमहानिरीक्षक शेखर पाटील यांनी अपर पोलीस अधीक्षक डॉ. काळे यांना चौकशी करण्याचे आदेश दिले होते. त्यांनी चौकशी केली. काहींचे जबाब नोंदविले.

चौकशी अहवाल पोलीस अधीक्षक पाटील यांना सादर केला. यानंतर अधीक्षक पाटील यांनी पोलीस उपनिरीक्षक व पाच कर्मचार्‍यांचे निलंबन केले होते.

आरोपी पळून गेल्याप्रकरणी निरीक्षक इंगळे यांचाबाबतीत गंभीर त्रुटी आढळून आल्या आहेत. तसा प्रसस्ताव अधीक्षक पाटील यांनी उपमहानिरीक्षक डॉ. शेखर पाटील यांच्याकडे पाठविला होता. यानंतर निरीक्षक इंगळे यांंच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.