अहमदनगर Live24 टीम, 28 ऑक्टोबर 2021 :- जिल्ह्यातील कासारे या गावात दलित सरपंचाच्या गळ्यात चपलाचा हार घालण्याची धक्कादायक घटना नुकतीच घडली होती. दरम्यान या गुन्ह्यामध्ये ॲट्रोसिटी केसमध्ये असलेल्या आरोपीला अटक करण्यात आली होती.

पण यानंतर काही तासातच सरपंच असलेल्या फिर्यादीलादेखील पोलिसांनी अटक केली आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, कासारे या गावामध्ये स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच दलित समाजाला सरपंच होण्याचा बहुमान मिळाला होता.

परंतु सरपंच महेश बोऱ्हाडे यांनी आपल्याला काम करू दिले जात नसल्याचे तसेच ते करत असलेल्या सार्वजनिक कामात अडथळा निर्माण केला जात असल्याची तक्रार जिल्हाधिकारी यांच्याकडे दिलेली होती.

यामध्ये त्यांनी उपसरपंच तसेच इतर तीन महिला सदस्यांचे पती कामात हस्तक्षेप करत असल्याचा आरोप केला होता. दरम्यान एके सरपंच महेश बोऱ्हाडे हे आपल्या बहिणीसोबत रुग्नालयात जात असताना

कृष्णाजी सूर्यभान कार्ले (विद्यमान महिला सदस्याचे पती) आणि मच्छिंद्र हिरामण कार्ले यांनी गाडी अडवून त्यांच्या गळ्यात चपलांचा हार घातला व महारांचा सत्कार आम्ही असाच करतो असे वक्तव्य केल्याचा आरोप केला आहे.

या घटनेनंतर पोलिसात तक्रार दाखल करण्यासाठी गेल्यानंतर तेथील ठाणे अंमलदाराने सुमारे पाच तास फिर्याद घेतली नसल्याचा आरोप पीडित सरपंचांच्या बहिणीने केला आहे.

दरम्यान या घटनेमध्ये फिर्यादी असलेल्या सरपंच महेश अण्णासाहेब बोऱ्हाडे यांच्यासह त्यांच्या भावावर आरोपींच्यावतीने चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. आता त्यांना देखील अटक करण्यात आली आहे.