अहमदनगर Live24 टीम, 12 ऑक्टोबर 2021 :- व्यापारी क्षेत्रातील महत्वाची मानली जाणाऱ्या नगर अर्बन मल्टिस्टेट शेड्युल्ड बँकेच्या निवडणुकीचा बिगूल वाजला आहे. संचालक मंडळाच्या १८ जागांसाठी २८ नोव्हेंबरला मतदान प्रक्रिया पार पडणार आहे.

तसेच मतमोजणी ३० नोव्हेंबरला होणार आहे. अर्बन बँकेच्या संचालक मंडळाची मुदत संपल्यानंतर दोन वर्षांनी ही निवडणूक होत आहे.

निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हा उपनिबंधक दिग्वीजय आहेर यांनी कार्यक्रम जारी केला आहे. अहमदनगर महानगर पालिका व भिंगार कँन्टोन्मेंट बोर्ड या हद्दीतील रहिवासी मतदार संघात एक जागा महिलेसाठी तर १ जागा अनुसुचित जाती व जमातीसाठी राखीव आहे.

या मतदारसंघात १२ जागा आहेत. तसेच अहमदनगर महानगर पालिका व भिंगार कँन्टोन्मेंट बोर्ड हद्दीतील रहिवासी कार्यक्षेत्र वगळून महाराष्ट्र राज्य मतदार संघासाठी ५ जागा असून त्यात एक जागा महिला प्रवर्गासाठी राखीव आहे.

महाराष्ट्र राज्याच्या कार्यक्षेत्राबाहेरील रहिवासी उर्वरीत कार्यक्षेत्र मतदार संघासाठी १ जागा आहे. अशा तीन मतदार संघातील १८ जागांसाठी हा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे.

बँकेचे सुमारे ५५ हजार ९९१ सभासद आहेत. प्रारूम मतदार यादी ११ आॅक्टोबरला सकाळी जाहीर केली जाणार आहे. हरकतींसाठी ११ ते १८ आॅक्टोबरचा कालावधी देण्यात आला आहे.

या हरकतींवर २० आॅक्टोबरला सुनावणी झाल्यानंतर २२ आॅक्टोबरला अंतिम मतदार यादी जाहीर होणार आहे.

नामनिर्देशनपत्र २६ आॅक्टोबरपासून स्विकारले जाणार आहेत.छाननी ३ नोव्हेंबरला होणार असून माघारीनंतर रिंगणातील अंतिम चित्र १२ नोव्हेंबरला स्पष्ट होणार आहे.

बँकेची सद्यस्थिती काय
२०१४ मध्ये झालेल्या बँकेच्या निवडणुकीत माजी खासदार स्व. दिलीप गांधी व स्व. सुवालाल गुंदेचा यांच्या नेतत्वाखाली सहकार पॅनेल तर सुभाष भंडारी व राजेंद्र गांधी यांच्या नेतृत्वाखाली जनसेवा पॅनल

अशी लढत होऊन गांधी व गुंदेचा यांचा पॅनेल सत्तेत आला होता. पण एनपीए वाढल्याने प्रशासक नेमला होता. आता रिझर्व्ह बँकेने परवानगी दिल्याने निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे.