अहमदनगर Live24 टीम, 17 एप्रिल 2022 AhmednagarLive24 :- राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथील तरूण प्रदीप आण्णासाहेब पंडीत याने नगर तालुक्यातील एका गावात राहणार्‍या तरूणीवर अत्याचार केला.

तिचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत तिच्याकडे वेळोवेळी पैशाची मागणी केली. या प्रकरणी पंडीत विरोधात नगर तालुका पोलीस ठाण्यात अत्याचार, खंडणी आदी कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित तरूणीने यासंदर्भात फिर्याद दिली आहे.

23 जानेवारी, 2022 रोजी दुपारी 12 ते तीन वाजेच्या दरम्यान अहमदनगर– कल्याण महामार्गावरील एका हॉटेलमध्ये ही घटना घडली असून या प्रकरणी आज रविवारी नगर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

फिर्यादी तरूणी व प्रदीप पंडीत हे दोघे नागापूर एमआयडीसीत कंपनीमध्ये कामाला होते. त्यांच्यामध्ये ओळख होती. 23 जानेवारी, 2022 रोजी दुपारी 12 वाजेच्या सुमारास प्रदीपने फिर्यादी तरूणीला फोन करून अहमदनगर शहरातील स्टेट बँक चौकात बोलून घेतले.

मैत्रिणीकडे चालले असे घरी सांगून फिर्यादी तरूणी स्टेट बँक चौकात गेली. तरूणी तेथे जाताच प्रदीपने तिला गाडीवर बसून अहमदनगर-कल्याण महामार्गावरील एका हॉटेलमध्ये नेले.

तेथे प्रदीपने एका रूममध्ये फिर्यादी तरूणीवर बळजबरीने अतिप्रसंग केला. घडलेल्या घटनेनंतर 15 दिवसांनी प्रदीपने कंपनीचे काम सोडले व तो गावी देवळाली प्रवरा येथे गेला.

त्यानंतर त्याने फिर्यादी तरूणीला फोन करून,‘खात्यावर पैसे टाक, नाहीतर मी तुझी बदनामी करेल’, असे म्हणून पैशाची मागणी केली.

फिर्यादी तरूणीने प्रदीपला पाच ते सहा वेळेस कधी 500 ते कधी एक हजार रूपये असे पैसे पाठविले. यानंतर पैसे पाठविणे बंद केल्याने प्रदीपने फिर्यादी तरूणीचे फोटो व्हॉट्सअपद्वारे स्टेटसला व्हायरल करतो, अशी धमकी देवुन खंडणी मागितली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. या गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक रणजित मारग करीत आहेत.