अहमदनगर Live24 टीम, 08 नोव्हेंबर 2021 :- कार-दुचाकीच्या अपघातात दुचाकीवरील दत्तात्रय सखाराम सासवडे (४५), सार्थक सखाराम सासवडे (१५) व निर्मला दत्तात्रय सासवडे (४०, धोत्रे-पारनेर) या तिघांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला.

हा अपघात शनिवारी सायंकाळी नाशिक-पुणे राष्ट्रीय महामार्गावरील बोटा येथे झाला. दत्तात्रय सासवडे दीपावली निमित्त पत्नी व मुलाला घेऊन दुचाकी (एमएच १६ एएफ ८४८२) वरुन पठारातील खंदरमाळवाडीच्या येठेवाडी येथे पाहुण्यांकडे चालले होते.

विना नंबरच्या कारने त्यांना जोराची धडक दिल्याने हे तिघे गंभीर जखमी झाले. त्यांना रुग्णालयात दाखल केले, मात्र दत्तात्रय, मुलगा सार्थक व पत्नी निर्मला तिघांचाही उपचारा दरम्यान मृत्यू झाला.

रविवारी उशिरापर्यंत घारगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते. दत्तात्रय सासवडे यांच्या पश्च्यात आई, वडील, मुलगा, तीन बहिणी असा परिवार आहे. या घटनेने धोत्रे गावात शोककळा पसरली आहे.