अहमदनगर Live24 टीम, 10 जानेवारी 2022 :-  ज्युसमधून गुंगीचे औषध देऊन तरूणीवर अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. मूळची नेवासा तालुक्यातील व सध्या अहमदनगर शहरात राहत असलेल्या

तरूणीने कोतवाली पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून राहुल शिवाजी वाकळे (वय 28 रा. कौठे बुद्रुक ता. संगमनेर) या तरूणाविरूध्द अत्याचार, अ‍ॅट्रोसिटी आदी कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान गुन्हा दाखल होताच कोतवाली पोलिसांनी आरोपी वाकळे याला संगमनेर येथून ताब्यात घेत अटक केली आहे. फिर्यादी तरूणीची राहुल वाकळे सोबत जून 2021 मध्ये ओळख झाली होती.

त्याने फिर्यादीच्या मोबाईलवर संपर्क साधून जवळीक वाढविली. मी नवीन पिकअप व्हॅन घेतली असून तुला पेढे द्यायचे आहेत, असे आरोपीने तिला मोबाईलवर सांगितले.

परंतु तिने भेटण्यास नकार दिला. त्यामुळे तो गाडी घेऊन तिच्याकडे भेटायला गेला. अहमदनगरमधील एका ज्युस बारमधून ज्युस पार्सल घेतले. तेथून फिर्यादी व राहुल विळद घाटात गेले.

तेथे त्यांनी ज्युस पिले. त्यानंतर तरूणीला भोवळ आली. त्याचा गैरफायदा घेऊन त्याने तिच्यावर अत्याचार केला. तरूणीने शुध्दीवर आल्यावर त्याने तिला ‘माझे काम झाले.

तुझे फोटो सुध्दा काढले आहेत. या घटनेबाबत वाच्यता केली तर तुझे फोटो सोशल मीडियावर व्हायरल करून तुझी व तुझ्या कुटूंबाची बदनामी करील’, अशी धमकी दिली.

ही घटना जून 2021 मध्ये घडल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. दरम्यान गुन्हा दाखल होताच अहमदनगर शहर पोलीस उपअधीक्षक अनिल कातकडे, कोतवालीचे पोलीस निरीक्षक संपत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली योगेश कवाष्टे,

अभय कदम, संतोष गोमसाळे, योगेश भिंगारदिवे, दीपक रोहकले, नितीन शिंदे यांच्या पथकाने संगमनेर येथून आरोपी वाकळे याला ताब्यात घेत अटक केली. पुढील तपास पोलीस उपअधीक्षक कातकडे करीत आहे.