अहमदनगर Live24 टीम, 15 जानेवारी 2021 :-ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाने तालुक्यातील नान्नज व जवळा परिसरातील अवैध दारू विक्री करणाऱ्यांविरोधात धडक कारवाई करत १ लाख,९ हजार ५२६ रूपयांचा मुद्देमाल जप्त केला.
तसेच याप्रकरणी नऊ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ऐन ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एवढी मोठी कारवाई केल्याने अवैध दारू विक्री करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.
ग्रामपंचायत निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर तालुक्यात अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणावर अवैध दारू विक्री होत असते. त्यानुसार पुण्याचे विभागीय आयुक्त प्रसाद सुर्वे,
अहमदनगरचे राज्य उत्पादन शुल्कचे अधीक्षक गणेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य उत्पादन शुल्क नगर निरीक्षक डी.आर ठोकळ, दुय्यम निरीक्षक एम. एस. धोका, तहसीलदार विशाल नाईकवाडे यांच्या उपस्थितीत नान्नज व जवळा परिसरात धडक कारवाई करत देशी विदेशी दारू,
गावठी दारू, रसायन, बीअर असा एकूण १ लाख ९ हजार ५२६ रूपयांचा मुद्देमाल जप्त करून याप्रकरणी नऊ जणांविरोधात कारवाई करण्यात आली आहे.
आगोदरच जामखेडचे पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांनी अवैध धंद्यांविरोधात मोहिम उघडली आहे. यातच आता राज्य उत्पादन शुल्क विभागाने धडक कारवाई केल्याने अवैध दारू विक्री करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.