Ahmednagar News : मतिमंद मुलीवर अत्याचार करणाऱ्या नराधमास येथील जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाने दहा वर्ष सक्तमजुरी व २० हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे. संगमनेर तालुक्यातील एका गावात १ फेब्रुवारी २०१९ रोजी संध्याकाळच्या सुमारास अत्याचाराची ही घटना घडली होती.
या संदर्भात पीडित मतिमंद मुलीच्या आईने घारगाव पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी अर्जुन अण्णासाहेब जोशी याच्या विरोधात अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. मतिमंद मुलगी सायंकाळी आपल्या गाई चारून घरी आली होती.
त्यानंतर ती घराशेजारी असलेल्या एका कुटुंबियाकडे टीव्ही पाहण्यासाठी गेली होती. यानंतर ती गायब झाली होती. मुलीचा नातेवाईकांनी शोध घेतला असता ती जवळपास कोठेही आढळून आली नाही. रात्री आठ वाजेच्या सुमारास पीडित मुलगी घराकडे येताना दिसली.
तिच्या पाठीमागे थोड्या अंतरावर आरोपी अर्जुन अण्णासाहेब जोशी हा देखील येताना दिसला. मुलगी घाबरून तिच्या आईजवळ गेली. तिला कोठे गेली होती असे विचारले असता तिने अर्जुन जोशी याच्याकडे बोट दाखवून त्याने तिला नेल्याचे खुणावून सांगितले.
तसेच अर्जुन जोशी याने बळजबरीने अत्याचार केल्याचे सांगितले. या खटल्याची सुनावणी अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश वाय. एच. अमेठा यांच्यासमोर झाली. सरकारी वकील संजय वाकचौरे यांनी केलेला युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायालयाने आरोपीला शिक्षा सुनावली.