अहमदनगर जिल्ह्यातील १०० तलाव होणार गाळमुक्त !

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Ahmednagar News : राज्य सरकारने पाणीटंचाईवर मात करताना शेत जमिनीला सिंचनाची सुरक्षितता मिळावी या मुख्य हेतूने गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार ही योजना हाती घेतली आहे.

नगर जिल्ह्यात या योजनेची अंमलबजावणी सुरू आहे. टाटा मोटर्स, नाम फाउंडेशन या संस्थांनी जिल्ह्यातील शंभर तलावांचा गाळ काढण्यासाठी सहयोग देऊ केला आहे.

तलावांची साठवण क्षमता वाढवितानाच काढलेला गाळ शेतजमिनी टाकल्यामुळे शिवाराचा पोत वाढण्याच्या दृष्टीने गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार ही योजना लाभदायकच असल्याचा निर्वाळा जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमाठ यांनी दिला.

गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार या योजनेच्या संदर्भात जिल्हाधिकारी सालीमठ यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या राजस्व सभागृहात गुरुवारी नाम फाउंडेशन आणि टाटा मोटर्स उद्योग समूहाच्या प्रतिनिधी समवेत बैठक घेतली.

यावेळी महसूल उपजिल्हाधिकारी अतुल चोरमारे, सहाय्यक जिल्हा जलसंधारण अधिकारी आकाश परदेशी, नाम फाउंडेशनचे प्रतिनिधी संग्राम खलाटे, गणेश गायकवाड आदी उपस्थित होते. टाटा मोटर्सचे शैलेश माऊलीकर यांनी मागील दोन दिवसात यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली.

या बैठकीत टाटा मोटर्स व नाम फाउंडेशन या संस्थांकडून जिल्ह्यातील तलावात साठलेला गाळ काढण्यासाठी मिळणाऱ्या सहयोगाबद्दल चर्चा करण्यात आली. जिल्ह्याच्या दक्षिण भागातील आवर्षण प्रणव क्षेत्रातील तसेच उत्तर विभागातील संगमनेर, अकोले राहता तालुक्यातील पठारी भागातील तलावातील गाळ काढण्यास प्राधान्यक्रम देण्यात यावा, असा सूचना जिल्हाधिकारी सालीमठ यांनी यावेळ दिल्या.

या बैठकीनंतर पुण्यनगरी प्रतिनिधीने संवाद साधला असता जिल्हाधिकारी सालीमठ म्हणाले, पाणीटंचाईवर मात करतानाच शेतीची सिंचन क्षमता वाढविण्यासाठी जलसंधारणाच्या कामांना पर्याय नाही. त्या दृष्टीनेच राज्यात जलयुक्त शिवार अभियान टप्पा दोन तसेच गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार या योजना हाती घेण्यात आल्या आहेत.

तलावातील साठलेला गाळ निघाला तर या तलावांची साठवण क्षमता वाढेल. तसेच हा काढलेला गाळ शेतकऱ्यांनी वाहतूक करून आपल्या शेतजमिनी टाकला तर जमिनीचा पोत सुधारेल आणि शेतीच्या उत्पन्नात वाढ होण्यास देखील याची मदत होईल.

आगामी काळात जिल्ह्यातील लहान मोठ्या तलावातील गाळ काढण्यासाठी उद्योजकांची मदत घेतली जाईल. त्यासाठी लवकरच उद्योजक संस्थाची बैठक आयोजित करण्याचा मानस जिल्हाधिकारी सालीमठ यांनी व्यक्त केला.