अहमदनगर बातम्या

वीजवाहक तारा तुटल्याने 11 गावांचा वीजपुरवठा खंडित; तब्बल 28 तास…

Published by
Ahmednagarlive24 Office

अहमदनगर Live24 टीम,  14 फेब्रुवारी 2022 :- नेवासाहून येणार्‍या वीजवाहक तारा तुटल्याने श्रीरामपूर तालुक्यातील अकरा गावांचा खंडित झालेला वीज पुरवठा 28 तासांनंतर सुरळीत करण्यात आला.

वीज पुरवठा सुरळीत करण्यात महावितरणला यश आल्याने त्या 11 गावांचा जीव भांड्यात पडला. श्रीमरापूर तालुक्यातील महावितरणच्या भोकर सबस्टेशनला नेवासा येथून येणारा 33/11 केव्ही वीज पुरवठा करणार्‍या वीजवाहक तारा नेवासा हद्दीत तुटल्याने तेथील एका शेतकर्‍यांचा दोन एकर ऊस जळाला.

त्याच बरोबर भोकर सबस्टेशनचा वीजपुरवठा खंडित झाल्याने 11 गावांत अंधार झाला होता. हा प्रकार लक्षात येताच महावितरणच्या कर्मचार्‍यांनी बिघाड दुरूस्तीसाठी प्रयत्न केले.

परंतु अधिभारामुळे नेवासा तालुक्यातील एका शेतकर्‍याच्या तोडणीला आलेल्या उसाच्या क्षेत्रात शार्टसर्कीट होऊन वीज वाहक तारा तुटल्याने शेतकर्‍याचा दोन एक ऊस जळाल्याचे लक्षात आले.

एवढ्या रात्रीही काम करण्याची तयारी कर्मचार्‍यांनी केली परंतु ऊस जळालेल्या संतप्त शेतकर्‍याने येथून वीज न्यायची नाही. आमच्या शेतातून वीज नेऊ देणार नाही, असा पवित्रा घेतला.

यावेळी झालेल्या बाचाबाचीत महावितरणच्या कर्मचार्‍यांना संतप्त शेतकर्‍यांच्या रोषाला सामोरे जावे लागले.

अखेर संबंधित शेतकरी व वरिष्ठ अधिकारी यांच्यात चर्चा होऊन जळालेल्या उसाच्या पंचनाम्यानंतर महावितरणचे कामकाज सुरू होऊन तब्बल 28 तासांनंतर 11 गावांचा वीज पुरवठा सुरळीत करण्यात आला.

Ahmednagarlive24 Office