Ahmednagar News : बनावट सोने तारण ठेवून येथील इंडियन ओव्हरसीज बँकेची २१ लाख ९१ हजार रुपयांची फसवणूक केल्याची घटना नुकतीच उघडकीस आली. याबाबत सोने मूल्यांकन कारासह पाच जणांविरुद्ध येथील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संगमनेर शहरामध्ये बनावट सोने तारण ठेवून वेगवेगळ्या बँकांना फसविण्याच्या घटना ताज्या असतानाच इंडियन ओव्हरसीज बँकेमध्ये ही असा प्रकार घडला आहे. सोने मुल्यांकनकार जगदीश सुभाष म्हसे व चार सोने तारण कर्जदार यांनी संगनमताने इंडियन ओव्हरसीज बँकेची फसवणूक केली आहे.
१० सोने तारण कर्ज प्रकरणात २१ लाख ९१ हजार ६७७ रुपयांची फसवणूक झाल्याचे नुकतेच उघडकीस आले आहे. बँकेमध्ये तारण ठेवलेले बनावट व खोटे सोने खरे असल्याचा बँकेस खोटा दाखला देवून सोने मूल्यांकनकाराने बँकेची फसवणूक झाली आहे.
याबाबत इंडियन ओव्हरसीज बँकेचे येथील शाखाधिकारी निवृत्ती नव्हाटे यांनी शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्या फिर्यादीवरून पोलिसांनी जगदीश सुभाष म्हसे (रा. घुलेवाडी, ता. संगमनेर), उत्तम विश्वनाथ पानसरे (रा. वाघापूर, ता. संगमनेर), लहानु किसन नेहे (रा. नांदुर दुमाला, ता. संगमनेर), मंगेश सपंत दिघे (रा. कोल्हेवाडी, ता. संगमनेर), जगदीश लक्ष्मण शहाणे (रा. घुलेवाडी) या पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.