अहमदनगर Live24 टीम, 18 ऑक्टोबर 2021 :- नगर तालुका पोलिसांनी नगर तालुक्यातील वाळकी येथील युवकाच्या हत्याकांड प्रकरणी ११ आरोपींवर गुन्हा दाखल केलेला असून त्यातील ३ आरोपींना अटक केली आहे. (Ahmednagar Crime News)
या तिघा आरोपींना न्यायालयाने २२ ऑक्टोबर पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. दरम्यान याप्रकरणातील उर्वरित ८ आरोपी फरार झाले आहे.
यामध्ये बाबा उस्मान शेख (वय ५०), सलीम उस्मान शेख (वय ४५), मोहसीन सलीम शेख (वय १८) या तिघांना पोलिसांनी अटक केली आहे.
तर तय्यब बाबा शेख, असिफ रसूल शेख, बानो असिफ शेख, मुन्नी सलीम शेख, ईशा बाबा शेख, शमशाद उस्मान शेख, नम्मू अय्युब शेख, फैय्याज अय्युब शेख हे ८ आरोपी फरार असून त्यांचा पोलिसांकडून कसून शोध घेतला जात आहे.
याबाबत अधिक माहिती अशी कि, सायकल लावण्यावरून लहान मुलांमध्ये झालेल्या वादाचे पर्यावसन दोन कुटुंबातील वादात होऊन यात एकाची डोक्यात दगड घालून हत्या करण्यात आल्याची घटना नगर तालुक्यातील वाळकी गावात घडली होती, भांड्याचे व्यापारी गनीभाई तांबोळी यांचा मुलगा जावेद गनीभाई तांबोळी (वय ३८) असे यातील मयताचे नाव आहे.
तर गनीभाई इब्राहीम तांबोळी (वय ६२) हे गंभीर जखमी झालेले असून त्यांच्यावर नगरमधील खाजगी रुग्णालयात उपचार सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.
या प्रकरणी मिनाज जावेद तांबोळी यांनी नगर तालुका पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी ११ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केलेला आहे.