Shevgaon News : शेवगाव तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीला मागील आर्थिक वर्षात ३ कोटी ३१ लाख २६ हजार रुपये नफा झाला असून, स्व. मारुतराव घुले पाटील यांनी घालून दिलेल्या मार्गदर्शक तत्वानुसार समितीची वाटचाल सुरु असल्याने ही बाजार समिती राज्यात अग्रेसर असल्याचे प्रतिपादन बाजार समितीचे सभापती एकनाथ कसाळ यांनी केले.
शेवगाव बाजार समितीची वार्षिक सर्वसाधारण सभा समितीचे सभापती एकनाथ कसाळ यांच्या अध्यक्षतेखाली व माजी आमदार चंद्रशेखर घुले यांच्या प्रमुख उपस्थितीत झाली, त्यावेळी ते बोलत होते. श्री. कसाळ पुढे म्हणाले- मा. आ. नरेंद्र घुले व मा. आ. चंद्रशेखर घुले यांच्या मार्गदर्शनाखाली आदर्श बाजार समिती म्हणून संस्थेने लौकिक मिळवला आहे.
अहवाल वर्षात समितीच्या उत्पन्नात वाढ झाली आहे. समितीने आजतागायत कुठल्याही प्रकारचे कर्ज घेतलेले नाही, शेतकरी निवास, व्यापारी संकुल, कांदा मार्केट, भुईकाटा, चाळणी यंत्र, सिमेंट रस्ते आदी विकासकामे केली आहेत.
यापुढील काळात शेवगाव येथे मुख्य बाजारात ८० टनी भुईकाटा व सौरऊर्जा प्रकल्प उभारणी, उपबाजार बालमटाकळी येथे ५० टनी भुईकाटा, बोधेगाव उपबाजार येथे पेट्रोल पंप उभारणी करण्याचा मानस आहे.या वेळी मा. आ. चंद्रशेखर घुले व काकासाहेब नरवडे यांची भाषणे झाली.