Ahmednagar News : पारनेर तालुक्यातील सुपा गावासाठी ना. राधाकृष्ण विखे यांच्या सहकार्यातून व शासनाच्या माध्यमातून पथदिव्यांसाठी तीन कोटींचा निधी मंजूर झाला आहे.
पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांचे सहकार्य व उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या आदेशावरून व सुप्याचे माजी उपसरपंच तथा भाजयुमोचे तालुका सरचिटणीस सागर मैड यांच्या पाठपुराव्यातून हा निधी मंजूर मजूर झाला असल्याचे खा. सुजय विखे यांनी सांगितले.
सुपा गावातून गेलेल्या पुणे-नगर महामार्गावरील वाढते अपघात व सुपा औद्योगिक वसाहतीत कामानिमित्त ये जा करणाऱ्या कामगारांची संख्या मोठी असून, गेल्या काही दिवसांपासून अपघाताचे प्रमाण वाढत आहे,
त्या दृष्टीने सुपा एमआयडीसी चौक ते सुपा गावठाण व सुपा गावठाण ते पवारवाडी, या तीन ते साडेतीन किलोमीटर अंतरात पथदिवे बसविण्यासाठी निधीची मागणी करण्यात आली होती.
यासाठी मैड यांनी ना. विखे व ना. सामंत यांच्याकडे सतत पाठपुरावा केला. अखेर ना. सामंत यांनी तातडीने निधी मंजुरीचे आदेश दिले व तब्बल तीन कोटींचा निधी मंजूर झाला आहे. याकामी एमआय डीसीच्या सर्व अधिकारी वर्गाचे मोलाचे सहकार्य लाभले.
प्रशासकीय मान्यता मिळाल्याचे समजताच खा. सुजय विखे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, महसूलमंत्री राधाकृष्ण विखे, उद्योगमंत्री उदय सामंत यांचे आभार मानले.
सुपा येथील विकास कामांत सुपा पाणी योजना, दुय्यम निबंधक कार्यालय, कचरा व्यवस्थापन जागा, सुपार बस स्टैंड, अग्निशामक दल, ही कामे तातडीने मार्गी लावण्याचे आश्वासन खा. विखे यांनी दिले आहे.
या वेळी भाजप प्रदेश कार्यकारणी सदस्य विश्वनाथ कोरडे, पारनेर तालुका भाजप अध्यक्ष राहुल पाटील शिंदे, माजी तालुका अध्यक्ष सुनिल थोरात, भाजयुमोचे तालुका सरचिटणीस सागर मैड, मधुकर पठारे, अमोल मैड,
सचिन मोहिते, बाळासाहेब शिंदे, सर्व पदाधिकारी, सरपंच, उपसरपंच ग्रा.पं. सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते.