अहमदनगर Live24 टीम, 20 जानेवारी 2021 :-राज्यात गोहत्याबंदी कायदा अस्तित्वात आहे. गोवंश जातीच्या जनावरांची कत्तल करण्यास बंदी असताना संगमनेरात मात्र या कायद्याचा धाक राहिला नसल्याचे चित्र आहे.
वाढते कत्तलखाने व गोवंश मांसाची तस्करीमुळे संगमनेर हे महाराष्ट्रातील गोवंश हत्येचे व गोमांस तस्करीचे केंद्र म्हणून कुप्रसिद्ध झाले आहे.
नुकतेच संगमनेरमध्ये गोवंश जनावरांची कत्तल सुरू असलेल्या पत्र्याच्या वाड्यात संगमनेर शहर पोलीस ठाण्याच्या पथकाने कारवाई करत 300 किलो गोमांस जप्त केले.
ही कारवाई मंगळवारी (दि. २०) पहाटे साडे पाचच्या सुमारास शहरातील जमजम कॉलनी येथे करत दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
गोमांस प्रकरणी फरमान मुंने कुरेशी (मूळ रा. उत्तरप्रदेश, हल्ली रा. भारत नगर, संगमनेर) व परवेज कुरेशी (जमजम कॉलनी, संगमनेर) या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यातील पोलीस कॉस्टेबल ज्ञानेश्वर सोनवणे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस नाईक रमेश लबडे अधिक तपास करीत आहेत.