Ahmednagar News : संत ज्ञानेश्वरांनी लिहिलेल्या ज्ञानेश्वरी ग्रंथाचे उगमस्थान असलेल्या नेवासे तालुक्यातील पैस खांब परिसराचा ज्ञानेश्वर सृष्टी नावाने विकास करण्यासाठी महसूल तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांच्या सूचनेनुसार ३२० कोटी रुपये खर्चाचा आराखडा तयार केला आहे.
हा प्रस्ताव लवकरच राज्य सरकारच्या पर्यटन विभागाकडे मंजुरीसाठी पाठवला जाणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी सिध्दराम सालीमठ यांनी दिली.
जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलता होते. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर उपस्थित होते. नेवासा येथे संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी ग्रंथ लिहिला. तो पैसा खांब परिसर ९ एकरचा आहे.
यामध्ये अध्यात्मिक केंद्र, मनःशांती केंद्र, ज्ञानेश्वरांच्या काळात असलेले नैसर्गिक वातावरण तयार करणे, लेझर शो अशा पद्धतीने ज्ञानेश्वर सृष्टीचा अराखडा तयार करण्यात आला आहे.
लवकरच तो राज्य सरकारकडे मंजुरीसाठी पाठवला जाईल. गुजरातमध्ये महात्मा गांधींच्या दांडी मार्चचा विकास आराखडा तयार करणारे डॉ. अजय कुलकर्णी यांनी ज्ञानेश्वर सृष्टीचा आराखडा तयार केला आहे. त्याचे सादरीकरणही करण्यात आले आहे. आता हा आराखडा मंजुरीसाठी पर्यटन विभागाकडे पाठवला जाईल, असे जिल्हाधिकारी सालीमठ यांनी सांगितले.
संत ज्ञानेश्वर यांच्या ज्ञानेश्वरी ग्रंथाचे जन्मस्थान व त्यांच्या अलौकिक कार्याचे प्रतीक म्हणजे पैसाचा खांब होय. त्या खांबालाच ‘पैस’, ‘पैसचा खांब’ किंवा ‘ज्ञानोबाचा खांब’ असे म्हणतात.’पैसचा खांब’ अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा या प्रवरा नदीच्या तीरावरील गावी आहे.
ते स्थळ नेवासे गावाच्या पश्चिमेला आहे. ज्ञानेश्वरांनी ‘ज्ञानेश्वरी’ त्या खांबाला टेकून बसून लिहिली असे समजतात. ‘पैस’ हा खांब कातीव काळा पाषाणरूपी आहे. त्या खांबाची सध्याची उंची चार फूट पाच इंच व रुंदी सोळा इंच आहे.
तो खांब, ज्ञानदेव म्हणतात त्याप्रमाणे ओथंबा अगर ओळंबा आहे. त्याच्यावर त्यांनी पाठ टेकली आणि सामान्यजन तर त्यांची डळमळीत श्रद्धा त्याच्या आधारानेच उभारू बघतात! हा स्थानुतुल्य खांब जीवनाच्या अमर अस्तित्वाचे प्रतीक आहे. तेथे आले, की माणूस स्वतःच्या आशानिराशा विसरतो.