Ahmednagar News: नगर तालुक्यातील खोसपुरी बस स्थानकाजवळ रेशनचा तांदूळ काळा बाजारात विक्रीसाठी घेऊन जाणारा ट्रक जिल्हा पुरवठा विभागाच्या पथकाने रविवारी पहाटे साडेपाच वाजता ताब्यात घेतला आहे.
यापूर्वी रेशनच्या मालाचा मोठ्या प्रमाणात काळाबाजार सुरू असल्याबाबत जिल्हा पुरवठा विभागाकडे तक्रारी केल्या होत्या. जिल्हा पुरवठा विभागाकडून ही कारवाई करण्यात आली आहे.
या कारवाईत अशोक उद्धव पवार (रा.अंमळनेर भांड्याचे ता.पाटोदा जि.बीड), सुनील कंठाळे (रा.दहिवडी ता. शिरूर कासार जि.बीड ), गोकुळ महादेव जाधव (रा.आर्वी ता. शिरूर कासार जि.बीड ) यांच्याविरुद्ध एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई जिल्हा पुरवठा अधिकारी जयश्री माळी यांच्या मार्गदर्शनाखाली पुरवठा निरीक्षण अधिकारी अभिजीत वांढेकर, दत्तात्रय महादेव भावले, राजेंद्र गणपत राऊत यांच्या पथकाने केली.
याबाबत अधिक माहिती अशी की, रविवारी पहाटेच्या सुमारास रेशनचा तांदूळ काळ्या बाजारात घेवून जाणार असल्याच्या माहितीवरून पुरवठा विभागाच्या पथकाने खोसपुरी शिवारात सापळा लावला होता.
दरम्यान पाथर्डी तालुक्यातील मिरीकडून पांढरी पुलाकडे एक ट्रक (एमएच २३ एक्यू ७९२१) येत असलेला पुरवठा विभागाच्या पथकातील अधिकाऱ्यांना दिसला. त्यांनी हात दाखवून चालकास थांबण्यास सांगितले त्यानंतर ट्रक थांबविल्यानंतर अधिकाऱ्यांनी ट्रकमध्ये असलेल्या मालाची पाहणी केली असता त्यांना पांढर्यारंगाच्या गोण्यांमध्ये रेशनचा तांदुळ असल्याचे दिसून आल्याने त्यांनी ट्रक चालकास त्याचा पत्ता विचारला असता त्याने आपले नाव गोकुळ महादेव जाधव (रा.आर्वी ता.शिरूर कासार जि.बीड) असे सांगितले.
त्यानंतर अधिकाऱ्यांनी सदरचा माल कोठून आनला याबाबत विचारणा केली असता अशोक उद्धव पवार यांच्या मालकीचे अंमळनेर भांड्याचे या गावातील खाजगी गोडावूनमधून भरून तो गुजरात येथे जात असल्याचे सांगितले.
तसेच हा ट्रक माझ्या ताब्यात मालक अशोक पवार व त्याचा सहकारी सुनील कंठाळे या दोघांनी धामणगाव येथे असलेल्या धानमेश्वर इंडियन ऑइलच्या पंपाजवळ दिला व मला गुजरात येथे खाली करण्यास सांगितला असल्याचे सांगितले.
त्यानंतर पुरवठा अधिकाऱ्यांनी चालकाला मालाच्या बिलाविषयी माहिती विचारली असता तसेच त्याच्याकडे कोणतेही कागदपत्रे आढळून आले नाही. मात्र नंतर त्याच्या मोबाईलवर एक बिल आले मात्र त्याबाबत अधिकाऱ्यांना संशय आल्याने त्यांनी ट्रक व ३३ टन रेशनचा तांदूळ असा एकूण ३१ लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी जिल्हा पुरवठा निरीक्षक शिवराज पवार यांच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलिसांनी पुन्हा दाखल केला आहे.