अहमदनगर Live24 टीम, 27 फेब्रुवारी 2022 :- महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोग अर्थात एमपीएससी मार्फत शनिवार दि.२६ रोजी दुय्यम सेवा अजरापत्रित पदासाठी एका सत्रात पूर्व परीक्षा घेण्यात आली.
या परीक्षेस अहमदनगर मधील ६० केंद्रामध्ये १८ हजार ६३६ उमेदवारांपैकी १३ हजार ९२८ उमेदवार हजर राहिले. या परीक्षेला ४ हजार ७९८ उमेदवारांनी दांडी मारल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी संदीप निचित यांनी दिली.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या निर्देशानुसार या परीक्षेचे काटेकोर नियोजन अहमदनगर शहरातील ६० उपकेंद्रांवर करण्यात आले होते. परीक्षेसाठी तब्बल १ हजार ७५० अधिकारी-कर्मचारी तैनात होते.
सहायक केंद्र प्रमुख म्हणून महसूल शाखेच्या तहसीलदार माधुरी आंधळे यांच्याकडे जबाबदारी होती. परीक्षा केंद्र परीसरात कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात होता.
परीक्षा केंद्र परीसरात नगर प्रांताधिकारी श्रीनिवास अर्जुन यांच्याआदेशानुसार कलम १४४ (३) जारी केले होते. या परीक्षेच्या काळात कोणताही अनुचित प्रकार घडला नाही.
परीक्षा केंद्रांवर उमेदवारांची आरोग्य तपासणी करण्यात आली. यामध्ये कोणीही विद्यार्थी कोरोना बाधित आढळून आले नाही.