Ahmednagar News : शेवगाव तालुक्यातील दहिगावने येथील रहिवासी अशोक क्षीरसागर यांच्या ५५ मेंढ्या मृत्युमुखी पडल्या. ही दुर्दैवी घटना गुरुवारी (दि.२५) रात्री घडली. मेंढ्यांवर वन्य प्राण्यांनी हल्ला केल्याचा प्राथमिक अंदाज आहे. मेंढ्यांच्या शरीरावर तशा जखमा आढळून आल्या आहेत.
घटनेची माहिती मिळताच प्रादेशिक वन विभाग पाथर्डीचे वनपरिक्षेत्र अधिकारी अरुण साबळे, वनपाल रामदास शिरसाठ, वनरक्षक स्वाती ढोले, अप्पासाहेब घनवट, प्रतीक लोढे आदींच्या पथकाने घटनास्थळी भेट दिली. पशुवैद्यकीय अधिकारी बापूसाहेब शिंदे यांनी उत्तरीय तपासणीसाठी व्हिसेरा घेतला आहे.
दहिगावने येथील रहिवासी असलेले मेंढपाळ अशोक क्षीरसागर यांच्या मेंढ्यांवर गुरुवारी (दि.२५) रात्री वन्य प्राण्याने हल्ला केला. या हल्ल्यात मोठ्या ४५ मेंढ्या, तर लहान १० मेंढ्या मृत झाल्या आहेत.
ही अतिशय दुर्दैवी घटना असून, परिस्थितीशी मोठ्या कष्टाने आणि धैर्याने दोन हात करणाऱ्या कुटुंबावर दुःखाचा आणि आर्थिक संकटाचा प्रसंग ओढवला आहे. घटनास्थळी भेट दिलेल्या सर्वांनीच दुःख व्यक्त केले.
वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी परिसरात पाहणी केली असता, त्यांना मात्र कोणत्या वन्य प्राण्यांनी हल्ला केला याचा निष्कर्ष काढता आला नाही. दरम्यान, सदर दुर्दैवी घटनेची तत्काळ दखल घेत माजी आमदार चंद्रशेखर घुले यांनी घटनास्थळी भेट दिली. पारनेरचे आमदार निलेश लंके यांनीही व्हिडीओ कॉलद्वारे संवाद साधून क्षीरसागर यांना धीर दिला. महसूल विभागाचे प्रतिनिधी, ग्रामपंचायतीचे पदाधिकारी व ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते.
येथील मेंढपाळाच्या एकाचवेळी इतक्या मोठ्या प्रमाणावर मेंढ्यांचा मृत्यू झाला. त्यामुळे त्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. अशा प्रकारची घटना मेंढपाळांसाठी गंभीर आहे. त्यामुळे अशा मोठ्या संकटात त्यांना शासकीय मदत मिळावी. त्यासाठी शासकीय अधिकाऱ्यांनी पाठपुरावा करावा, अशी मागणी या भागातील नागरिकांनी केली आहे.
या मेंढ्यांवर हल्ला नेमका कोणत्या प्राण्याने केला, याचा निष्कर्ष काढता आला नाही. मात्र, पशुवैद्यकीय विभागाकडून प्राप्त होणाऱ्या उत्तरीय तपासणी अहवालानंतर योग्य ती कार्यवाही विशेष प्रभावाने करण्यात येईल. – अरुण साबळे, वनपरिक्षेत्र अधिकारी, पाथर्डी