अहमदनगर जिल्ह्यात मान्सून सुरु झाल्यापासून अर्थात मागील पावणेदोन महिन्यात बहुतांश भागात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. दक्षिणेत चांगला पाऊस असताना उत्तरेत विशेषतः पाणलोट क्षेत्रात पाऊस कमी होता.
परंतु आषाढ लागताच पाणलोटातही चांगला पाऊस सुरु झाला आहे. त्यामुळे धरणांतही पाणी आवक वाढली आहे. मागील पावणेदोन महिन्यात जिल्ह्यात ६३ टक्के पाऊस अहमदनगर जिल्ह्यात झाला आहे.
या दिवसांचा विचार केला तर सरासरी २८४ मिलिमीटर पाऊस झाला आहे. एकूण पावसाच्या तुलनेत ६३.४ टक्के पाऊस झाला आहे. सर्वाधिक पाऊस श्रीगोंदा तालुक्यात ९२ टक्के म्हणजे ३७२.६ मि.मी. झाला आहे. सर्वांत कमी पाऊस श्रीरामपूर तालुक्यात ४४.५ टक्के नोंदविला गेला आहे.
पावसाचे आणखी दोन महिने शिल्लक आहे. जिल्ह्यात चार महिन्यांत सरासरी ४४८.१ मि.मी. पाऊस अपेक्षित आहे. यंदा जून महिन्यात मृग नक्षत्राने दाणादाण उडवून दिली. जिल्ह्यात सर्वदूर पावसाने दमदार हजेरी लावली होती.
या पावसानेच खरीप पेरणीस प्रारंभ झाला. जून महिन्यात १०८.२ मि.मी. पाऊस अपेक्षित आहे. मात्र या महिन्यात सरासरी १७७ मि.मी. नोंद झाली आहे. गेल्या वर्षी फक्त ५३ मि.मी. पावसाची नोंद झाली होती. यावर्षी मात्र सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाल्याने शेतकरी सुखावला आहे.
तालुकानिहाय पाऊस, मि.मी. (टक्केवारी)
नगर २९९.५ (६२), पारनेर २७९.४ (६७.४), श्रीगोंदा ३७२.६ (९२), कर्जत ३९८.२ (८९), जामखेड ४३८ (७६), शेवगाव २८२ (६०.९), पाथर्डी ४३० (९०.९)
नेवासा २२४.३ (५२.२), राहुरी २०४ (४७.२), संगमनेर २०१ (५७.२), अकोले २५५.३ (५२.२), कोपरगाव २११.३ (५२.३), श्रीरामपूर २०६ (४४.५), राहाता २०८.९ (४६).
लाभक्षेत्रात वरूणराजाची हजेरी
लाभक्षेत्र असलेल्या राहुरी परिसरातही रविवारी हलक्या पावसाच्या सरी कोसळत होत्या. केवळ ओलावा निर्माण होऊन ढगाळ हवामान निर्मिती होत आहे. लाभक्षेत्रातही मोठ्या पावसाची अपेक्षा केली जात आहे.
मुळा धरणात पाण्याची आवक वाढली
नगर दक्षिणेची तृष्णा भागविणाऱ्या मुळा धरणाचा पाणीसाठा आठ हजार दलघफू बनला आहे. तळाला गेलेल्या पाणीसाठ्यात वाढ होत असून गत पंधरवड्यातच धरणात तीन हजार दलघफू नविन पाणी जमा झाले आहे.
त्यामुळे धरणसाठा ९६०० दलघफू इतका झाला असून धरणाकडे ५ हजार ९०० क्यूसेक प्रवाहाने नविन पाण्याची आवक सुरू आहे.
भंडारदरा
अहमदनगर जिल्ह्यातील सर्वात महत्त्वाचे समजले जाणारे भंडारदरा धरण ५० टक्के भरले असून धरणाचा पाणीसाठा ५ हजार ५०८ दशलक्ष घनफुट इतका झाला आहे.
धरण क्षेत्रामध्ये पावसाची बॅटिंग सुरुच असून भंडारदरा धरणाच्या पाणलोटात सुरू असलेल्या पावसामुळे भंडारदरा धरणामध्ये नवीन पाण्याची आवक मोठ्या प्रमाणात सुरू आहे.