अहमदनगर बातम्या

ताजनापुर टप्पा दोनचे ६५ टक्के काम पूर्ण; पुढील वर्षी काम पूर्ण होऊन जानेवारीत सुरवातीला २५ टक्के शेतातील विहिरींना पाणी पुरवठा केला जाईल

Published by
Ajay Patil

ताजनापुर टप्पा दोन योजनेचे ६५ टक्के काम पूर्ण झाले आहे. रायझिंग मेन तसेच वितरण पंप हाऊसचे ९५ टक्के कामे पूर्ण झाली आहेत. यासह शेतातील पाईप लाईनचे देखील ६५ टक्के काम पूर्ण झाले आहे. या योजनेचे टेंडर साधारण दीड वर्षापूर्वी निघाले आहे. पुढील वर्षी काम पूर्ण होऊन जानेवारीत सुरवातीला २५ टक्के शेतातील विहिरींना पाणी पुरवठा केला जाईल.

ठिबक सिंचन योजनेचे टेंडर अद्याप निघालेले नाही. त्यामुळे ते रद्द होण्याचा प्रश्नच येत नाही. पाईप लाईनचे काम पूर्ण झाल्याखेरीज ठिबकचे काम कसे करता येईल, असे सांगून पाईप लाईनचे काम पूर्ण झाल्यावर साधारणपणे जुन मध्ये ठिबक सिंचन योजनेच्या टेंडरची प्रक्रिया सुरु होईल अशी अपेक्षा असल्याची माहिती जलसंधारण विभागाच्या वतीने देण्यात आली आहे.

या योजनेचा सुमारे २० हजार शेतकऱ्यांना फायदा होणार असून सहा हजार नऊशे साठ हेक्टर क्षेत्राला याचा लाभ होईल, असे जलसंधारण विभागाच्या वतीने सांगण्यात आले. सध्या निवडणुकीच्या अनुषंगाने प्रचारात आरोप प्रत्यारोप सुरु असून ताजनापुर योजना वरुन होणाऱ्या आरोपाचे खंडन करतांना, भाजपचे ज्येष्ठ नेते बापूसाहेब पाटेकर यांनी असे कोणत्याही प्रकारचे टेंडर निघाले नसल्याचे तसेच रद्द न झाल्याचे सालवडगाव येथे बोलतांना सांगितले.

यावेळी माहिती अधिकारात याची माहिती युवकांनी घ्यावी व सत्यता पडताळावी असे आवाहन करतांना, निवडणूक काळात विरोधक खोटे आरोप करुन, या प्रकारे संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहेत, असे पाटेकर म्हणाले. याबाबत वस्तुस्थिती जाणून घेण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांकडे विचारणा केली असता त्यांनी निवडणूक असल्याने नावं न छापण्याच्या अटीवर वरील माहिती दिली आहे.

या योजने बाबत बोलतांना, कुरुडगाव येथील गट नंबर १९२ मध्ये, मे महिन्यात रान मोकळे असताना, शेता पर्यंत पाईप लाईनचे काम झाले आहे. ज्या ठिकाणी शेत मोकळे असेल अश्या क्षेत्रात काम होऊन, आमच्या गावच्या शिवारात, शेती अंतर्गत बऱ्या पैकी पाईप लाईनचे काम झाले आहे असे कुरुडगाव येथील शेतकरी बाबासाहेब थोरात यांनी सांगितले.

Ajay Patil