महावितरण कंपनीला ८ हजार ५०० कोटी रुपयांची मदत !

Ahmednagarlive24 office
Updated:

अहमदनगर Live24 टीम, 18 मार्च 2022 Ahmednagar News: :- राज्य सरकारने महावितरण कंपनीला सुमारे ८ हजार ५०० कोटी रुपये मदत देण्याचे जाहीर केल्याने राज्यातील कृषी पंप शेतकरी ग्राहकांचा वीज तोडणी कार्यक्रम मागे घेण्यात अाला, अशी माहिती ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी बोलताना दिली.

विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात शेतकऱ्यांच्या वीज तोडणी संदर्भात सदस्यांच्या भावना तीव्र होत्या. शेतकऱ्यांचीही मागणी असल्याने विचारविनिमय व चर्चा झाल्यानंतर वीज तोडणीची मोहीम मागे घेण्यात आल्याचे जाहीर करण्यात आले.

प्राजक्त तनपुरे म्हणाले, राज्यातील महाविकास आघाडी सरकार पुढे अनेक आव्हाने व अडचणी होत्या. करोना परिस्थितीला सामोरे जावे लागल्याने सरकारचा उत्पन्नाचा स्त्रोत मंदावून त्याचे विपरीत परिणाम झाले.

अशा बिकट स्थितीत राज्य सरकारने धोरणात्मक निर्णय घेऊन शेतकऱ्यांना दिलासा देण्याची भूमिका घेतली आहे. शेतकऱ्यांकडील सध्याची उभी असलेली पिके निघेपर्यंत वीज तोडणी मोहिम थांबविण्यात येणार असल्याची घोषणा सरकारकडून करण्यात आली. तत्कालीन सरकारच्या काळात महावितरण कंपनीला मदत करण्याबाबत दुर्लक्ष केले गेले.

वेळोवेळी निधीची गरज असताना हा निधी दिला नाही. उलट केंद्रातील सरकारने महावितरण कंपनीला कर्ज मिळणार नाही, अशी व्यवस्था करून बँकांना पत्र दिल्याने महावितरणपुढे अधिकच अडचण वाढत गेली.

अशी गंभीर परस्थिती असतानाही महाविकास आघाडी सरकारने शेतक-यांबाबत मदतीचे धोरण हाती घेतले आहे. सरकारने नवीन विज कृषी धोरण आणले असून त्यात शेतक-यांना वीज बीलाची ६५ ते ७० टक्के रक्कम माफ केली जात आहे.

नवीन कृषी धोरण २०२० ची अंमलबजावणी सध्या सुरू असून या योजनेचा लाभ शेतकऱ्यांना होणार आहे. मागील सरकारच्या काळात महावितरण कंपनीवर कर्जाचा बोजा वाढत गेल्याने कंपनी दुष्टचक्रात सापडली. त्यातून मार्ग काढत पुढील वाटचाल चालू असल्याचे राज्यमंत्री तनपुरे यांनी स्पष्ट केले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe