अहमदनगर बातम्या

ग्रामपंचायत निवडणूकीसाठी १५ जागांसाठी ८६ अर्ज ! विखे व थोरात समर्थकांचे गट आमने-सामने

Published by
Ahmednagarlive24 Office

Ahmednagar News : संगमनेर तालुक्यातील आश्वी बुद्रुक ग्रामपंचायत निवडणूकीसाठी १५ जागांसाठी ८६ अर्ज दाखल झाले आहेत.

महसुलमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील व माजी महसुलमंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांच्या समर्थकांचे गट आमने-सामने उभे ठाकणार असल्याने अटीतटीची दुरंगी लढत होणार आहे.

सरपंच पद अनुसूचित जमातीच्या व्यक्तीसाठी आरक्षित असल्याने उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी अनेकांनी उड्या घेतल्यामुळे अखेरच्या दिवशी दोन्ही गाकडून सदस्य पदासाठी ८६ तर सरपंच पदासाठी ६ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. मात्र अर्ज माघारीच्या दिवशी म्हणजे (दि. २५) ऑक्टोबरला निवडणूकीचे चित्र स्पष्ट होणार आहे.

माजी महसुलमंत्री आमदार बाळासाहेब थोरात गटाची आश्वी बुद्रुक ग्रामपंचायतीवर सत्ता होती. तर महसूलमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील गटाचे कार्यकर्ते ही सत्ता आपल्याकडे खेचण्यासाठी एकास एक उमेदवार मैदानात उतरवत शर्थीचे प्रयत्न करणार आहे.

हि निवडणूक ना. विखे व आ. थोरात गटासाठी अतिशय प्रतिष्ठेची असल्याने दोन्ही गटाकडून निवडणूकीची व्यूहरचना सुरु करत मोर्चे बांधनीला वेग आल्याने गावात निवडणूकीचे वातावरण तापण्यास सुरूवात झाली आहे.

दरम्यान, होऊ घातलेल्या निवडणूकीत आश्वी बुद्रुकचे एकूण ५ हजार ४०६ मतदान आहे. येथे सदस्य पदासाठी ८६ उमेदवार तर लोकनियुक्त सरपंच पदासाठी ६ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत.

त्यामुळे गावातील राजकीय वातावरण तापण्यास सुरूवात झाली असून २५ ऑक्टोबर रोजी म्हणजे माघारीच्या दिवशी निवडणुकीचे अंतिम चित्र स्पष्ट होणार आहे. तसेच या दाखल झालेल्या अर्जाची छाननी २३ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता सुरु होईल.

उमेदवारी अर्ज २५ ऑक्टोबर रोजी दुपारी ३ वाजेपर्यत मागे घेता येईल. यांच दिवशी चिन्ह वाटप होणार असून मतदान ५ नोव्हेंबर रोजी सकाळी ७.३० ते ५.३० या वेळेत पार पडणार आहे. तर ६ नोव्हेंबर रोजी सकाळी मतमोजणी व निकाल जाहीर केला जाणार आहे.

Ahmednagarlive24 Office