Ahmednagar News : जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षण विभागातील केंद्रप्रमुखांची पदोन्नती प्रक्रिया मागील काही वर्षांपासून राखली होती. यावर अनेकदा ही पदे भरण्यासाठी मागण्या झाल्या. परंतु प्रशासनाने अद्याप या जागा भरल्या नव्हत्या.
यावर टीका देखील झाली होती. परंतु आता प्रशासनाने अखेर ८९ मुख्याध्यापकांना केंद्रप्रमुखपदी बढती देत यास सुरवात केली. परंतु नेहमीप्रमाणेच बोगस प्रमाणपत्राचा शाप असणाऱ्या शिक्षण विभागास यावेळी देखील बोगस प्रमाणपत्राचे ग्रहण लागणार का अशी चर्चा सुरु झाली आहे.

विशेष म्हणजे शिक्षण विभागाने कारवाईचा इशारा दिल्यानंतर ८ शिक्षकांनी या प्रक्रियेतून माघार घेतली. त्यामुळे चर्चांना तर जास्तच उधाण आले.
* सोमवारी (दि.२०) राबवली प्रक्रिया
जिल्ह्यात प्राथमिक शिक्षण विभागात साधारण २४६ केंद्रप्रमुखांची पदे मंजूर असून अद्याप पर्यंत केवळ ३४ पदेच भरली गेली होती. दरम्यान यातील १२३ पदे पदोन्नतीने भरायची तरतूद आहे.
त्यानुसार ही बहुप्रतीक्षित भरती प्रक्रिया प्रशासनाने सोमवारी (दि.२०) राबवली. परंतु यावेळी काही शिक्षक संघटनांनी काही शिक्षकांनी बोगस पदवी प्रमाणपत्रे सादर केल्याचा आरोप केल्यानंतर प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारु असा सज्जड इशाराच दिला.
त्यामुळे ८ शिक्षकांनी माघार घेतली असल्याचं कळतंय, दरम्यान त्यांनी माघार त्यांच्या गैरसोयींमुळे घेतली की पदवी प्रमाणप्रमुळे याची खातरजमा होऊ शकलेली नाही.
* ‘त्या’ आठ शिक्षकांची झाकली मूठ सव्वा लाखाची
केंद्रप्रमुख पदोन्नतीसाठी शिक्षण विभागाने जिल्ह्यातील एकूण ४६० पात्र शिक्षकांची यादी तयार केली होती. या यादीतून सेवाज्येष्ठतेनुसार य समुपदेशनाने पदोन्नती देण्यात आली.
बोगस पदवीचे प्रमाणपत्र सादर करणाऱ्यांवर कारवाईचा इशारा दिल्यानंतर आठ शिक्षकांनी माघार घेतली. त्यामुळे आता पदोन्नतीचा लाभ घेतलाच नाही तर मग कारवाई कशी करायची असा पेच सध्या प्रसाशनाला पडला आहे.
त्यामुळे ‘त्या’ आठ शिक्षकांची झाकली मूठ सव्वा लाखाची राहिली अशीच चर्चा शिक्षक वर्तुळात रंगली आहे.