Ahmednagar News : यंदा जुनमध्ये जिल्ह्यातील अनेक भागात दमदार पाऊस पडला होता. त्यामुळे शेतकऱ्यांनी खरिपाची पेरणी केली आहे. यात मूग, तूर, उडीद ,सोयाबीन, कापूस आदी पिकांची पेरणी केली आहे.
यंदा जिल्ह्यात जून महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात पावसाने जोरदार हजेरी लावली. त्यानुसार जिल्ह्यात एकूण ९० टक्के पेरणी झाली असून यात कडधान्य पिकाची ८६ टक्के पेरणी झाली आहे. याचबरोबर बाजरी पिकाची ६५ हजार ९९ हेक्टरवर पेरणी झाली आहे. तर १ लाख ३५ हजार ९४० हेक्टरवर कपाशीची सर्वाधिक लागवड झाली आहे.
जिल्ह्यात खरीपाची ९० टक्के पेरणी झाली असून, कृषी विभागाने ठरविलेल्या उदिष्टापैकी सोयाबीन व तुरीच्या क्षेत्रात वाढ झाली आहे. मात्र बाजरीच्या क्षेत्रात घट झाल्याचे कृषी विभागाने दिलेल्या आकडेवारी नुसार स्पष्ट होत आहे.
जिल्ह्याचे खरीप हंगामाचे सरासरी क्षेत्र ६ लाख ७४ हजार ४६१ हेक्टर आहे. दरवर्षी पडणारा पाऊस आणि हवामान खात्याच्या प्राथमिक माहितीच्या आधारे कृषी विभाग खरीप हंगामाच्या पेरण्या प्रस्ताविक करतात. यानुसार यंदा ६ लाख ६१ हजार हेक्टवर खरिपाच्या पेरण्या झाल्या आहेत.
यात कृषी विभागाने ठरविलेल्या सोयाबीन पिकाची सरासरी क्षेत्र ८७ हजार ३३० हेक्टर होते. यात प्रत्यक्षात वाढ होवून १ लाख ५१ हजार १९७ इतक्या क्षेत्रावर पेरणी झाली आहे. तूरची ३६ हजार १०४ हेक्टर सरासरी क्षेत्र असून, यात दुपटीने वाढ झाली असून जिल्ह्यात ६५ हजार ९४६ इतकी पेरणी झाली आहे. मात्र, बाजरी पिकाची घट झाली असल्याचे प्रशासनाने दिलेल्या आकडेवारी मध्ये दिसत आहे.
नगर जिल्ह्यात विशेष करून दक्षिण भागात नगर, पारनेर, कर्जत, जामखेड आणि उत्तर नगर जिल्ह्यातील पठार भागात कडधान्य पिकांच्या पेरण्या होतात. यात प्रामुख्याने उडीद, तूर, मूग, मटकी या कडधान्य पिकांचा समावेश असून जिल्ह्याच्या उर्वरित भागात बाजरी, सोयाबीन, कापूस, चारा पिकांसह ऊस लागवड करण्यात येते. यंदा जिल्ह्यात काही भागात मृगनक्षत्रात जोरदार तर काही ठिकाणी तुरळक पावसाने हजेरी लावली.
त्यात काही शेतकऱ्यांनी पेरणी केली असून पावसाने पाठ फिरविल्याने शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. यंदा जिल्ह्यातील तापमानात कमालीची वाढ झाली असून मे आणि जून महिन्यांत माणसांसोबत जनावरांच्या अंगाची लाहीलाही झाली होती. नगर जिल्ह्यात ३० जूनपर्यंत मूग आणि उडीद कडधान्य पिकांच्या पेरणीचा कालावधी आहे.
मात्र अनेक भागात पावसाने हुलकावणी दिल्याने या कालावधीत या पिकांची पेरणी न झाल्यास या पिकांचे क्षेत्र दुसऱ्या पिकांकडे वळत असल्याचे कृषी विभागाकडून सांगण्यात आले. यामुळे मूग, उडिदााऐवजी सोयाबीन, कापूस, तूर आणि चारा पिकांचे क्षेत्र वाढ झाली. अद्याप ही शेतकऱ्यांना मोठ्या पावसाची प्रतीक्षा आहे.