अहमदनगर Live24 टीम, 17 जानेवारी 2022 :- राज्यातील सर्वात उंच असलेल्या कळसूबाई शिखरावरील मंदिराचा जीर्णोद्धार करावा, तसेच तेथे सुविधा उपलब्ध करून देण्यात याव्यात व मंदिराचे पावित्र्य राखले जावे,
या मागणीसाठी हौसाबाई लक्ष्मण नाईकवाडी या ९१ वर्षे वयाच्या वृद्ध महिलेने अकोले तहसील कार्यालयासमोर शुक्रवारपासून बेमुदत उपोषण सुरू केले आहे.
पहिल्या दिवशी उपोषण मागे घ्यावे, यासाठी वन खात्याच्या अधिकाऱ्यांनी प्रयत्न केले मात्र ते निष्फळ ठरले आहेत. देवीने आदेश दिल्याशिवाय आपण उपोषण सोडणार नाही, असे सांगत त्यांनी उपोषण सोडण्यास ठाम नकार दिला.
शनिवारी दुसऱ्या दिवशी उपोषण सुरुच होते.अकोले तालुक्यातील कळसुबाई शिखरावर कळसुबाई देवीचे छोटेसे पुरातन मंदिर आहे. कळसुबाई ही परिसरातील अनेकांचे कुलदैवत आहे.
वर्षभर शिखरावर भाविकांचा राबता सुरू असतो. नवरात्रात दहा दिवस भाविकांची रीघ लागते. राज्यभरातुन अनेक गिर्यारोहक या शिखराला भेट देत असतात.
शिखरावर असणारे हे मंदिर अतिशय छोटे असून एकावेळी तीन चार व्यक्ती मंदिरात जाऊ शकतात. शिखरावर येणाºया भविकांसाठी अन्य कोणताही निवारा उपलब्ध नाही.
बºयाच वेळेला भाविक, गिर्यारोहक मंदिरातच निवाऱ्यासाठी आश्रय घेतात. त्यामुळे मंदीरात योग्य ते पावित्र्य राखले जाऊ शकत नाही.
या जीर्ण झालेल्या मंदिराचा जीर्णोद्धार करावा तसेच शिखरावर भविकांसाठी निवाऱ्याची सुविधा उपलब्ध करून द्यावी, अशी हौसाबाई नाईकवाडी यांची मागणी आहे.
आपल्या मागणीला प्रशासनाकडून योग्य प्रतिसाद न मिळाल्याने या मागणीकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी त्यांनी हे बेमुदत उपोषण सुरू केले आहे.