अहमदनगर Live24 टीम, 05 नोव्हेंबर 2021 :- गैरव्यवहारामुळे नगर अर्बन बँक गेल्या काही वर्षांपासून चर्चेचा विषय राहिली आहे. बँकेतील गैरव्यवहाराबाबत पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत.
बँकेचा एनपीए वाढल्यामुळे रिझर्व्ह बँकेने संचालक मंडळ बरखास्त करून प्रशासकाची नियुक्ती केली होती. मात्र आता नगर अर्बन मल्टिस्टेट शेडयुल्ड बँकेच्या निवडणुकीचा बिगुल वाजला आहे.
संचालक मंडळाच्या 18 जागांसाठी 28 नोव्हेंबरला मतदान होणार आहे, तर 30 नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. बँकेच्या निवडणुकीसाठी सोमवारी पात्र उमदेवारांची यादी प्रसिध्द होणार आहे.
त्यानंतर 9 ते 12 नाव्हेंबरपर्यंत माघारीसाठी मुदत असून शुक्रवार (12) उमेदवारांची अंतिम मतदार यादी प्रसिध्द होणार आहे.
दरम्यान, बँकेच्या निवडणुकीसाठी बँकेच्या दाखल केलेल्या नऊ उमेदवारी अर्जावर हरकती नोंदविण्यात आल्या असून, त्यावर निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हा उपनिबंधक दिग्विजय आहेर यांनी सुनावणी घेतलेली आहे.
बँकेच्या 18 जागांसाठी होत असलेल्या संचालक मंडळ निवडणुकीसाठी एकूण 94 उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. निवडणुकीतील वैध उमेदवारांची यादी 8 नोव्हेंबरला प्रसिद्ध होणार आहे.
12 नोव्हेंबरला अंतिम उमदेवारी जाहीर झाल्यानंतर 15 तारखेला चिन्हाचे वाटप झाल्यानंतर निवडणुकीची रणधुमाळी पेटणार आहे.