Ahmednagar News : राहुरी फॅक्टरी येथील तरुणाची स्विफ्ट कार पलटी होऊन अपघात झाल्याची घटना बुधवारी रात्री देवळाली बंगला परिसरात घडली असून या अपघातात राहुरी फॅक्टरी येथील ओम दादा पुंड या १९ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला आहे.
याबाबत समजलेली माहिती अशी की,राहुरी फॅक्टरी येथील आदिनाथ वसाहत येथील तरुण ओम दादा पुंड याने दोन दिवसांपूर्वी खरेदी केली होती. बुधवारी रात्री स्विफ्ट कारमधून श्रीरामपूरवरून राहुरी फॅक्टरी येथे आपल्या घरी जात असताना देवळाली बंगला परिसरात स्विफ्ट कार पलटी झाली. कारने तीन ते चार वेळा जोरदार पलटी घेतल्या. यामध्ये ओम पुंड हा गंभीर जखमी झाला.
त्याला कार मधून तातडीने काढण्यात आले.
याकामी नगरसेवक आदिनाथ कराळे,जगन्नाथ मुसमाडे, निलेश पवार, वसीम शेख, सचिन रसाळ, बापू मुसमाडे, बाळासाहेब मुसमाडे, महेश पवार, विक्रम फाटे, विजय मुसमाडे, रवींद्र मुसमाडे आदींसह परिसरातील नागरिक व सामाजीक कार्यकर्त्यांनी धावपळ करुन भीमतेज मित्र मंडळाच्या रुग्णवाहिकेद्वारे तातडीने राहुरी येथील सरकारी दवाखान्यात उपचारासाठी नेले उपचारापूर्वीच वैद्यकीय सूत्रांनी ओंकार पुंड यास मृत म्हणून घोषित केले.
मयत ओंकार याच्या पश्चात आई, वडील,बहीण आदी परिवार आहे. ओंकार हा एकुलता होता त्याच्या निधनाने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. ओम याच्यावर आज राहुरी फॅक्टरी येथील प्रसाद नगर भागातील अमरधाम येथे दुपारी १२ वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.