अहमदनगर बातम्या

७० वर्षीय महिलेवर अत्याचार, नंतर खून..मृतदेहावर तीन दिवस पुन्हा अत्याचार, पुरोगामी महाराष्ट्राला झालेय काय?

Published by
Ahmednagarlive24 Office

महिलांवरील अत्याचाराच्या घटनांनी सबंध राज्य हादरून गेले आहे. अगदी चार-पाच वर्षांच्या चिमुकल्यांपासून ७० वर्षांच्या वृद्ध महिलांवर अत्याचाराच्या घटना समोर येत असल्याने पुरोगामी महाराष्ट्रासमोर अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.

रोजच्या रोज नवीन घटना समोर येत असतानाच लातूर जिल्ह्यातील भेटा (ता. औसा) येथे एका ३५ वर्षीय नराधमाने ७० वर्षीय वृद्धेवर अत्याचार करून तिच्याच साडीने गळफास देऊन तिची हत्या केल्याची घटना सोमवारी उघडकीस आली आहे.

एक वेळ बलात्कार करून तिची हत्या करणे हे कमी की काय, म्हणून नराधम आरोपीने मृत वृद्धेच्या शरीरावर तीन दिवस अत्याचार केल्याची कबुली दिली असून, क्रौर्याची परिसीमा ओलांडणाऱ्या आणि माणुसकीला काळिमा फासणाऱ्या या घटनेने लातूर जिल्हा हादरला आहे.

पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, भेटा येथील एक ७० वर्षीय विधवा महिला पतीच्या निधनानंतर गेल्या २५ वर्षांपासून आपल्या मुलाला घेऊन माहेरी (बोरगाव नकुलेश्वर) येथे राहते. स्वभावाने थोडी भोळसर असलेली ही महिला कधी कधी भेटा येथे आपल्या सासरी नातेवाईकांकडे जात असे.

शुक्रवार, २३ ऑगस्ट रोजी ती भेटा येथे गेली असता मन्सूर सादीक होगाडे (३५) या नराधम तरुणाने तिला काहीतरी धान्य देण्याचे आमिष दाखवत घरात बोलावले. त्या रात्रीच तिच्यावर अत्याचार करून तिच्याच साडीने तिची गळफास देऊन हत्या केली. या घटनेची चर्चा होऊ नये म्हणून मृतदेह तसाच स्वतःच्या घरात ठेवून तो घरावरील पत्र्यावर झोपायचा.

शनिवारी सकाळी ११.३० वा. बाहेरगावी गेलेली आरोपीची आई घरी आल्यानंतर हा धक्कादायक प्रकार समोर आला. घटनेची माहिती मिळताच भादा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. पंचनाम्यादरम्यान पोलिसांनी तत्काळ आरोपी मन्सूर होगाडेला ताब्यात घेतले असून,

अत्याचार करून हत्या केल्याची व त्यानंतर तब्बल तीन दिवस मृतदेहावर शारीरिक अत्याचार केल्याची तोंडी कबुली या विकृत आरोपीने पोलिसांना दिली आहे. या प्रकरणातील नराधम आरोपी एका गंभीर गुन्ह्यातील आरोपी असल्याचे समजते.

याप्रकरणी मयत वृद्ध महिलेच्या मुलाने दिलेल्या फिर्यादीवरून भादा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती. गंभीर गुन्हे दाखल करेपर्यंत मृतदेह ताब्यात न घेण्याचा आक्रमक पवित्रा नातेवाईकांनी घेतला होता.

घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन गावात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून, अपर पोलीस अधीक्षक अजय देवरे यांनी घटनास्थळी भेट दिली आहे

Ahmednagarlive24 Office