Ahmednagar News : स्वतः हिंदुत्ववादी म्हणवणाऱ्या तसेच मुस्लिमांचा द्वेष करणाऱ्या भाजपाला महाराष्ट्र विधानपरिषद निवडणुकीत एमआयएम, अबू आझमीची मते कशी चालतात ? राज्यात सध्या कायदा सुव्यवस्था बिघडण्याला देवेंद्र फडणवीस जबाबदार आहेत.
उद्धव ठाकरेंना संपवण्याची भाषा करताना लोकच तुम्हाला संपवून टाकणार असल्याची टीका शिवसेना ठाकरे गटाचे आ. भास्करराव जाधव यांनी भाजपवर व भाजपच्या नेत्यांवर केली.
आ.जाधव यांनी नुकतीच शिर्डी येथे साईदरबारी हजेरी लावली. दर्शनानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी विरोधकांबरोबरच सहयोगी पक्षाचाही चांगलाच समाचार घेतला. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाच्या मतदारसंघावर काँग्रेस दावा करत आहे याबाबत त्यांना विचारले असता ते म्हणाले की,
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस अनेक ठिकाणी शिवसेना उबाठा गटाच्या मतदारसंघात दावा करत असेल तर त्यांनी २०१९ च्या निवडणुकीचा इतिहास तपासावा.
कारण त्यावेळी त्यांची स्थिती ही केंद्रात चौथ्या स्थानी होती तर महायुतीत ते तिसऱ्या स्थानी होते. त्यामुळे आत्ताच झालेल्या लोकसभा निवडणुकीत राज्यात त्यांना यश मिळून ते पहिल्या क्रमांकावर आले असले तरी हे यश आमच्या जीवावर मिळाले याचे काँग्रेस नेत्यांनी भान ठेवावे या शब्दांत आ. जाधव यांनी काँग्रेस नेत्यांना सुनावले.
त्यानंतर नुकत्याच पुणे येथे झालेल्या भाजपच्या मोठ्या कार्यक्रमात देशाच्या गृहमंत्र्यांनी उद्धव ठाकरे हे औरंगजेब फॅन क्लबचे मेंबर असल्याचे वक्तव्य केले होते. या वक्तव्याचा समाचार घेताना जाधव म्हणाले, स्वतः हिंदुत्ववादी म्हणवणाऱ्या तसेच मुस्लिमांचा द्वेष करणाऱ्या भाजपाला महाराष्ट्र विधानपरिषद निवडणुकीत एमआयएम, अबू आझमीची मते कशी चालतात ?
राज्यात सध्या कायदा सुव्यवस्था बिघडण्याला देवेंद्र फडणवीस जबाबदार आहेत. उद्धव ठाकरेंना संपवण्याची भाषा करताना लोकच तुम्हाला संपवून टाकणार असल्याचा टोला त्यांनी लगावला.
उद्धव ठाकरे व देवेंद्र फडणवीस यांच्या वाक्युद्धावर बोलताना जाधव म्हणाले, या सर्व प्रकाराला फडणवीस जबाबदार असून त्यांचा राजकीय अंत जवळ आल्याने ते असे बोलत आहेत.
उद्धव ठाकरे यांनी केलेल्या वक्तव्याचा देशाने विचार करावा, असे सांगत त्यांनी उद्धव ठाकरे मराठा आरक्षणाला जबाबदार कसे? असा सवाल सत्ताधाऱ्यांना केला. आगामी विधानसभेत आपला विजय निश्चित असून दीड फूट चंगू मंगुंना आपण किंमत देत नाही, असा टोला त्यांनी नाव न घेता राणे यांना लगावला. जाधव यांच्या साई दर्शनानंतर राष्ट्रवादीचे अजीत पवार गटाच्या नेत्यांनी त्यांचा सत्कार केला.