२५ जानेवारी २०२५ : श्रीगोंदा : तालुक्यातून गेलेल्या जामखेड ते न्हावरा या राष्ट्रीय महामार्गावरील श्रीगोंदा ते काष्टी रस्त्यादरम्यान अपघातांची मालिका सुरूच असून हा रस्ता मृत्यूचा सापळाच बनला आहे.लिंपणगाव शिवारात श्रीगोंदा ते काष्टी रस्त्यावर बंद पडलेल्या श्रीगोंदा आगाराच्या बसला पाठीमागून दुचाकीची धडक बसून झालेल्या अपघातात एकजण ठार झाला.
या अपघातात दुचाकीस्वार डॉ. नवनाथ अशोक साबळे (वय- ३८) हे गंभीर जखमी झाले.अपघातानंतर तब्बल एक तास त्यांना मदत मिळाली नाही.त्यानंतर त्यांना उशिराने उपचारार्थ खाजगी रुग्णालयात हलविण्यात आले.मात्र ते जागीच मयत झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.घटनास्थळी बघ्याची भूमिका घेणाऱ्यांवर नागरिकांनी संताप व्यक्त करून तब्बल एक तास महामार्ग रोखून धरला.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, श्रीगोंदा आगाराची बस (क्र. एमएच. १४, बीटी. ०८७४) ही बिघाड झाल्यामुळे लिंपणगाव शिवारात रस्त्याच्या बाजुला लावून दुरुस्ती चालली होती.या बसला होंडा शाईन मोटासायकलस्वार (एम. एच. १६, बीडी ६३३४) समोरून अचानक आलेल्या गाडीच्या प्रकाशामुळे ताबा सुटल्याने धडक बसून झालेल्या अपघातात दुचाकीसह चालक बसच्या खाली गेल्यामुळे डॉ. नवनाथ अशोक साबळे यांना गंभीर दुखापत झाली.
अपघातानंतर रस्त्यावर बघ्यांची मोठी गर्दी जमली होती.मात्र तब्बल एक तासभर कोणाचीही मदत न मिळाल्याने साबळे हे रस्त्यावरच पडून होते.काही जागृत नागरिकांनी रुग्णवाहिकेशी संपर्क साधत त्यांना खाजगी रुग्णालयात दाखल केले.मात्र तेथील डॉक्टरांनी साबळे हे मयत झाल्याचे घोषित केले.
या दरम्यान रस्त्यावर वाहनांची गर्दी झाल्यामुळे यामुळे तणावपूर्ण वातावरण झाले होते.श्रीगोंदा पोलिसांना माहिती मिळताच घटनास्थळी धाव घेत वाहतूक सुरळीत केली.दरम्यान श्रीगोंदा पोलीस ठाण्यात याबाबत कोणताही गुन्हा दाखल झाला नसल्याची माहिती मिळाली असून मयत डॉ. नवनाथ साबळे हे जनावरांचे डॉक्टर होते.
श्रीगोंदा आगारात जीर्ण बसेसची मोठी संख्या
श्रीगोंदा आगारात सध्या ५९ बसेस कार्यरत आहेत.यातील अनेक गाड्या १० ते १५ वर्षे जीर्ण आणि खटारा झालेल्या आहेत.लांब पल्ल्यासाठी ६ बसेस, मध्यम पल्ल्यासाठी ८ बसेस तर बाकीच्या गाड्या ग्रामीण भागासाठी कार्यरत आहेत.सर्व बसेसची मिळून रोज एकूण २० हजार किलोमीटर पर्यंत प्रवास होतो.यातील अनेक गाड्या वारंवार रस्त्यावरच बंद पडतात.
गेल्या वर्षभरात अशा असंख्य गाड्या बंद पडलेल्या होत्या.अनेक गाड्यांना इंडिकेटर, रिफ्लेक्टरची वानवा आहे.त्याचाच परिणाम म्हणून रात्रीच्या वेळेस इतर वाहन चालक अपघातास बळी पडत आहेत.याबाबत आगार व्यवस्थापक संदीप ढवळे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी अपघातावेळी बंद बसचे इंडिकेटर चालू होते,अशी माहिती दिली.मात्र अपघातवेळीची परिस्थिती तेथे उभे असलेलेच सांगू शकतील,हे मात्र खरे.