अहमदनगर Live24 टीम, 4 जानेवारी 2021 :-शेतीच्या कामासाठी घर बंद करून शेतात गेलेल्या शेतकऱ्याच्या घरावर चोरटयांनी डल्ला मारला आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, गळनिंब येथील अनिल बबन शेळके (वय 38) यांनी नेवासा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून
त्यात म्हटले की, मी, पत्नी, आई व वडील 1 जानेवारी रोजी सकाळी सात वाजता घरापासून दीड किमी अंतरावर असणार्या चिकणी येथील शेतात घर बंद करून कांदे लावण्यासाठी गेलो होतो.
सायंकाळी पाच वाजता वडील बबन शेळके हे शेतातून घरी आले. तर त्यांना घरासमोरील संरक्षक भिंतीच्या गेटचे कुलूप तोडलेले दिसले. त्यांनी आम्हाला फोन करून घराचे कुलूप अज्ञात इसमाने तोडल्याचे सांगितले.
आम्ही घरी येऊन पाहिले असता घराच्या मागील बाजूच्या दाराचे कडी-कोयंडे तोडून अज्ञात इसमाने घरातील सामानाची उचकापाचक करून घरातून रोख रक्कम 50 हजार रुपये (शंभर व पाचशे रुपयाच्या नोटा), एक तोळ्याचे सोन्याचे झुंबर, सोन्याची दीड तोळ्याची पोत, एक तोळे सोन्याच्या रिंगा असा ऐवज चोरून नेला.
गेल्या दीड-दोन महिन्यांतील सलाबतपूर-शिरसगाव परिसरातील ही पाचवी मोठी घटना आहे. यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.