फसवणुकी प्रकरणी जामखेडच्या ज्ञानराधा मल्टीस्टेट संस्थेच्या पदाधिकाऱ्यांसह १९ जणांवर गुन्हा दाखल !

Pragati
Published:
dnyanradha

ज्ञानराधा मल्टीस्टेट संस्थेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, अधिकारी व सर्व संचालकासह १९ जणांवर ठेवीदारांची १ कोटी १० लाख ६८ हजार रुपयांची फसवणूक केल्या प्रकरणी जामखेड पोलीस स्टेशनला महाराष्ट्र ठेवीदारांच्या (वित्तीय संस्थांमधील हितसंबंधाचे संरक्षण अधिनियम 1999 नुसार भारतीय न्याय संहिता विएनएस 2023 नुसार 316 (2), 316 (5), 318 (4), 61(2) प्रमाणे गुन्हा दि. ७ रोजी दाखल झाला आहे.

याबाबत नितीन राधाजी राजपुरे यांनी जामखेड पोलीस स्टेशनला दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की सन 2022 मध्ये ज्ञानराधा मल्टीस्टेट कॉ क्रेडीट सोसायटी, जि. बीड, शाखा जामखेडचे अध्यक्ष सुरेश कुटे, त्यांची पत्नी संचालक अर्चना कुटे व सर्व संचालक, बँक मॅनेजर व कर्मचारी यांनी वारंवार संपर्क करून आमची बँक इतर बँकेपेक्षा एफडीवर जास्त व्याज दर देत असून, तुम्ही फिक्स डिपॉझिट करा, असे सांगितले.

त्यानुसार सदर संस्थेत चार लाख रुपये डिपॉझीट केले, त्यानंतर आरडी पुस्तकात तीन लाख अठरा हजार, आणि वडिलांनी तीन लाख रुपयांची एफडी केली. अशा प्रकारे माझी व वडिलांची दहा लाख अठरा हजार रुपये ठेव ठेवली होती.

११ ऑक्टोबर 2023 मध्ये जामखेड येथील ज्ञानराधा मल्टीस्टेट संस्था बंद दिसल्याने शाखा व्यवस्थापक सचिन खांडे यांना फोन केला असता, त्यांनी तांत्रिक कारणांमुळे बंद असल्याचे सांगितले. या वेळी जवळपास ५००० ठेवीदार जमा झाले होते.

आम्ही सर्वजण जामखेड तहसीलदारांची भेट घेतली, त्यांनी संस्थेचे अध्यक्ष सुरेश कुटे व त्यांची पत्नी संचालक अर्चना कुटे यांना फोन केला असता, त्यांनी लवकरात लवकर बँक चालू करू, असे आश्वासन दिले. त्यांनी ठेवीदारांचे पैसे वैयक्तिक वापरात प्रॉपर्टी, शेअर बाजार, ट्रान्सपोर्ट कंपनी, तिरूमला ऑईल व इतर व्यवसायात गुंतवणूक केली आहे.

तसेच माझे मित्र प्रमोद राऊत ३२ लाख ५० हजार, प्रविण सानप १० लाख, महारुद्र नागरगोजे ९ लाख, अरुण सुतार ४२ लाख, ऋषिकेश डुचे ३ लाख, उदयकुमार दहातोंडे ४० लाख, असे एकूण १ कोटी १० लाख ६८ हजार रुपयांची फसवणूक केली आहे.

ज्ञानराधा मल्टीस्टेट संस्थेचे अध्यक्ष सुरेश कुटे, उपाध्यक्ष यशवंत कुलकर्णी, संचालक अर्चना कुटे, अशिश पाटोदेकर, वसंत सटाले, वैभव कुलकर्णी, कैलास मोहिते, शिवाजी पारसकर, रवींद्र तांबे, रेखा सटाले, रघुनाथ खरसाळे, रवींद्र यादव, सुशील हाडुळे, सचिन खांडे (सर्व रा. बीड),

आशा पाटील (रा.सोलापूर) , नारायण शिंदे (रा. अंबड, जि. जालना), दादाराव उंदरे (रा. वाशी, जि. धाराशिव), कल्याण गोरे (रा. पाटोदा, जि. बीड), राजेंद्र पोकळे (रा. अमळनेर, ता. शिरूर, जि. बीड), अशा १९ जणांवर फसवणूकीचा गुन्हा दाखल झाला आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe