भारतीय पुरातत्व विभागाच्या ताब्यात असलेल्या चांदबीबी महाल म्हणजेच सलाबत खानाची कबर असलेल्या ऐतिहासिक वास्तूत मोठ्या आवाजात स्पीकरवर गाणे लावून वाढदिवस साजरा करत या ऐतिहासिक वास्तूचा गैरवाजवी वापर केल्या प्रकरणी नगर मधील मोहन लुल्ला यांच्या सह ३० ते ४० जणांवर नगर तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत भारतीय पुरातत्व विभागाच्या नगर कार्यालयातील संतोष अंबादास महाजन यांनी फिर्याद दिली आहे. यामध्ये म्हंटले आहे की, भारतीय पुरातत्व सर्व्हेक्षण विभाग यांच्या अंतर्गत राष्ट्रीय संरक्षित पुरातत्व वास्तू असलेल्या चांदबीबी महाल या वास्तूत पुरातत्व विभागाची कुठलीही परवानगी न घेता ३० ते ४० जणांनी मोठ्या आवाजात स्पीकरवर गाणे वाजवत मोहन लुल्ला यांचा वाढदिवस साजरा केला.
त्यामुळे या संरक्षित वास्तूचा गैरवाजवी वापर झाला आहे. या फिर्यादी वरून पोलिसांनी मोहन लुल्ला यांच्यासह ३० ते ४० जणांवर पुरातत्वीय स्थळ व अवशेष अधिनियम १९५८ चे कलम ३० (१) सह भारतीय न्याय संहिता कलम २२३ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.