नेवासा येथे, लज्ज्जा उत्पन्न होईल असे वर्तन करुन, एट्रॉसिटीची धमकी व शिवीगाळ करण्यात आली आहे. एवढेच नाही तर जिवे मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार देखील नुकताच घडला आहे. याप्रकरणी नेवासा पोलीस ठाण्यात सचिन रतन धोंगडे या आरोपीविरुद्ध नुकताच गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला तीच्या घरामध्ये सासु, पती, मुलगा, मुलगी असे एकत्र राहते. तीची तालुक्यातील एका अंगणवाडीत सुमारे १३ वर्षांपासून नेमणूक आहे. त्या आंगणवाडीला शासनाने वॉल कंपाउंड केलेले असून शाळा सुटल्यावर अंगणवाडीला तसेच वॉल कंपाउंडच्या गेटला कुलूप लावून चाव्या ती आपल्याकडे ठेवत असते.
सचिन धोंगडे याने अनेक वेळा त्यांना दमदाटी केली. मंगळवारी (दि. २) सकाळी १०.१५ वाजेच्या सुमारास ती तसेच अंगणवाडी मदतनीस अंगणवाडी येथे असताना अंगणवाडीच्या आतमध्ये सचिन धोंगडे हा आला व त्यांना अंगणवाडीच्या वॉल कंपाउंडच्या चाव्या मागू लागला. मात्र त्यांनी त्याला चाव्या दिल्या नाही.
याचा त्याला राग आल्याने त्याने फिर्यादीच्या अंगावर धावुन जावून त्यांचा हात धरुन लज्ज्जा उत्पन्न होईल, असे वर्तन केले. हातातून चाव्या हिसकावून घेऊन अंगावर फेकल्या, तसेच तुझ्यावर अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करीन, तसेच तुला जिवंत ठेवणार नाही, अशी धमकी दिली.
त्यानंतर घडलेल्या प्रकाराबाबत फिर्यादीने वरिष्ठ कार्यालयात जाऊन वरिष्ठांची भेट घेऊन समक्ष माहिती दिली व तक्रार देण्यासाठी पोलीस ठाणे गाठल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.