अकरा व तेरा वर्षीय शाळकरी मुलींना तुम्ही मला आवडता, म्हणत त्यांचा पाठलाग करणाऱ्या तरुणाविरुद्ध कोपरगाव शहर पोलिस ठाण्यात बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण अधिनियमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
घटनेबाबत अधिक माहिती अशी की, पुणतांबा फाटा परिसरातील दोन अल्पवयीन मुली कोपरगाव शहरातील कन्या विद्यामंदिर शाळेत शिक्षणासाठी येतात. दि. २४ नोव्हेंबर रोजी सकाळी नऊ वाजता त्या घरातून शाळेला जाण्यासाठी निघाल्या.
पुणतांबा फाटा येथून त्यांच्या मागे अमोल बापू मोरे (वय २८, रा. शंकरनगर, कोपरगाव) हा लागला. घरापासून ते शाळेपर्यंत त्यांचा पाठलाग करीत असताना हातवारे करून मुलींना खुणवायचा.
शाळा जवळ आल्यावर त्याने चॉकलेटचे आमिष दाखवून तुम्ही मला आवडता, असे म्हणत राहिला. शाळेच्या गेटमध्ये तो घुसला होता. यापूर्वी २१ नोव्हेंबरलाही त्याने असाच प्रकार केला होता.
सदर प्रकार मुलींनी आपल्या वडिलांना सांगितला. त्यानंतर शुक्रवारी मुलीच्या वडिलांनी कोपरगाव शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. या तक्रारीवरून अमोल मोरे याच्याविरुद्ध भादंवि कलम ३५४, ३५४ (ड), बालकाचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण अधिनियमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीस पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. घटनेचा अधिक तपास सहायक पोलिस निरीक्षक महेश येसेकर करीत आहेत.
व्यवस्थापन समितीने लक्ष देण्याची मागणी
कन्याशाळेत यापूर्वी मुलीच्या पालकांनासुद्धा प्रवेशद्वारातून प्रवेश दिला जात नव्हता. मात्र, शुक्रवारी मुलीची छेड काढणारा मवाली थेट शाळेत घुसला होता. या प्रकाराकडे शाळा व्यवस्थापनाने लक्ष देण्याची मागणी पालकांमधून होत आहे. वेळीच लक्ष न दिल्यास मुलीच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, असेही पालकांचे म्हणणे आहे.