कान्हुर पठार (ता. पारनेर) येथील – राजे शिवाजी पतसंस्थेचा चेअरमन, जिल्हा परिषदेचा माजी सदस्य आझाद प्रभाकर ठुबे, व्यवस्थापक संभाजी सीताराम भालेकर यांच्यासह संस्थेच्या १२ संचालकांविरोधात ठेवीदारांची फसवणूक केल्याप्रकरणी पारनेर पोलिस ठाण्यात सोमवारी (२९ जुलै) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी अटक असलेला आझाद ठुबे सध्या न्यायालयीन कोठडीत आहे. पतसंस्थेचा अध्यक्ष आझाद – प्रभाकर ठुबे, उपाध्यक्ष शमशुददीन गुलाबभाई इनामदार, संचालक उदयकुमार बळवंत सोनावळे, विजय दिनकर काकडे, संतोष गुलाब ठुबे, भाऊसाहेब बबन नवले, प्रमोद नारायण लोटे, संतोष पोपटलाल कोठारी, किशोर दिपक शिंदे, साहेबराव किसन जेजुरकर ज्योती तुषार ठुबे, सारीका भास्कर पोपळघट, संभाजी सिताराम भालेकर कार्यकारी संचालक (सर्व. कान्हूर पठार, पारनेर), भगवंत नंदकुमार चंद्रकांत ठुबे (नगर) अशी आरोपींची नावे आहेत.
यासंदर्भात ठेवीदार बाळासाहेब तुकाराम वाळुंज (रा. काकणेवाडी ता. पारनेर) यांनी फिर्याद दिली. त्यात म्हटले आहे की, राजे शिवाजी पतसंस्थेच्या कान्हूर पठार व टाकळी ढोकेश्वर शाखांमध्ये वाळुंज यांचे बचतखाते आहेत. टाकळी ढोकेश्वर येथील खात्यात १ लाख १९ हजार ६२७ रुपये आहेत, तर प्रत्येकी १ लाखाच्या ९ मुदत ठेव पावत्या आहेत.
खात्यावरील रक्कम तसेच मुदत संपलेल्या ठेवींच्या रकमेची मागणी केली असता, संस्थेने ही रक्कम देण्यास टाळाटाळ केली. बचत खात्यावरील रक्कम, तसेच ठेवी मिळत नसल्याने उदरनिर्वाह करणे अवघड झाले आहे.
संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी वेळोवेळी प्रलोभने दाखवून गुंतवणूक करण्यास भाग पाडल्याचे वाळुंज यांनी फिर्यादीत म्हटले आहे. शिवाय, सूर्यभान सोन्याबापू मेहेत्रे, गोविंद रामभाऊ पवार, पोपट अवडाजी भालेकर, तान्हाजी भानुदास खोडदे, रघुनाथ ज्ञानदेव खोडदे व इतर अनेक ठेवीदरांनी पतसंस्थेकडे ठेवलेल्या ठेवींची मुदत पूर्ण झाल्यानंतर रकमेची मागणी केली, परंतु त्यांनाही रक्कम मिळू शकली नसल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे.
संस्थेकडून ठेवींची रक्कम मिळण्यास टाळाटाळ होऊ लागल्यानंतर सहायक निबंधक, जिल्हा उपनिबंधकांकडे तक्रार केली होती. त्यानंतर जिल्हा सहकारी उपनिबंधकांच्या लेखापरीक्षण विभागाने राजे शिवाजी पतसंस्थेच्या व्यवहारांची तपासणी सुरू केल्याचे सांगण्यात आल्याचे वाळुंज यांनी फिर्यादीत म्हटले आहे.