अहमदनगर बातम्या

अहमदनगर जिल्ह्यात बनावट दाखले देवून फसवणूक, तिघांवर गुन्हा दाखल

Published by
Ahmednagarlive24 Office

Ahmednagar News : राज्यात सध्या शासन आपल्या दारी हा उपक्रम सुरू असून त्याच्या नावाखाली गरजूना बनावट दाखले दिल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. तालुक्यातील जाफ्राबाद येथील काही लोकांना काल गुरुवारी विवाह नोंदणीचे प्रमाणपत्र, शाळा सोडल्याचे बनावट दाखले दिले.

याप्रकरणी कामगार तलाठी अविनाश जयवंत तेलतुंबडे यांच्या फिर्यादीवरुन येथील तालुका पोलीस ठाण्यात विष्णु नारायण शिंदे (वय 30, रा. कोन्हाळे, ता. राहाता) व रविंद्र शंकर आरणे (वय 36, रा. कोन्हाळे, ता. राहाता), सोपान सखाराम उमाप (वय 78, रा. एकलहरे) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दोघा आरोपींना अटक केली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तालुक्यातील जाफ्राबाद ग्रामपंचायत शेजारी दोन इसम बॅगेसह आलेले आहेत. ते गावातील काही लोकांना विवाह नोंदणीचे प्रमाणपत्र, शाळा सोडल्याचा दाखले, जातीचे प्रमाणपत्र काढून देण्यासाठी आले आहेत.

ते गावातील लोकांना सांगत आहेत कि शासन आपल्या दारी हा शासनाचा उपक्रम चालू असून त्यासाठी गरजुना विवाह नोंदणीचे प्रमाणपत्र, शाळा सोडल्याचे बनावट प्रमाणपत्र घरपोहोच काढून आणुन देत आहेत, अशी माहिती येथील नायब तहसीलदार वाघचौरे व जाफ्राबादचे सरपंच संदिप शेलार यांनी फिर्यादी तलाठी यांना फोनवर कळविले.

त्यानंतर फिर्यादी तलाठी जाफ्राबाद येथे गेले असता, तेथे हजर असलेले दोन इसम यांना त्याचे नाव, गाव विचारले असता, त्यांनी त्यांचे नाव विष्णु शिंदे व रविंद्र आरणे, असे असल्याचे सांगितले. तेव्हा विवाह नोंदणीचे प्रमाणपत्र, शाळा सोडल्याचा दाखले,

जातीचे प्रमाणपत्र, असे अनेक कागदपत्र त्यांच्याकडे पाहिले असता त्यात अनेक विवाह प्रमाणपत्र तसेच शाळा सोडल्याचे अनेक प्रमाणपत्र तसेच वेगवेगळ्या जातीचे दाखले आढळले, अशा प्रकारचे दाखले देण्याचे शासनाचा कोणताही उपक्रम चालू नसल्याने सदर कागदपत्र बनावट असल्याचा संशय आल्याने त्या कागदपत्रासह वरील दोन्ही इसमांना गावातील लोकांच्या मदतीने येथील प्रातांधिकारी कार्यालयात आणले.

त्याच्याकडे असलेले जातीचे दाखले सदर कार्यालयातून दिल्याची खात्री कार्यालयात केली असता, त्याच्याकडे असलेले जातीचे दाखले येथील प्रातांधिकारी कार्यालयातुन निर्गमीत केलेले असल्याचे दिसून आले नाही.त्यावरुन वरील दोन्ही आरोपींनी अवैध पैसे घेवुन लोकांना बनावट प्रमाणपत्र तयार करून आणून दिल्याचे उघड झाले.

शासनासह लोकांची फसवणूक

पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेवून विचारणा केली असता, विष्णु नारायण शिंदे याने सांगितले कि, सदरचे बनावट कागपत्र हे त्याच्या ओळखीचा सोपान सखाराम उमाप (रा. एकलहरे, ता. श्रीरामपूर) यांच्याकडुन तो बनवून आणतो आणि लोकांकडून प्रति प्रमाणपत्र दिड हजार रुपये प्रमाणे आणुन देतो. त्यामधील सोपान उमाप याला एक हजार रुपये व स्वतःला 500 रुपये, असे दोघांत वाटुन घेतात, असे स्पष्ट झाले.

त्यामुळे आरोपींनी शासन आपल्या दारी या उपक्रमाचे बतावणी करून विवाह नोंदणीचे प्रमाणपत्र, शाळा सोडल्याचे दाखले, जातीचे प्रमाणपत्र, असे अनेक वेगवेगळ्या प्रकारचे बनावट प्रमाणपत्र तयार करून सदरचे प्रमाणपत्र खरे आहे,

असे सांगुन पैसे घेवून लोकांची तसेच उपविभागीय कार्यालय श्रीरामपूर, मुख्याध्यापक प्राथमिक शाळा नांदूर, मुख्याध्यापक प्राथमिक शाळा शिर्डी, मुख्याध्यापक प्राथमिक शाळा साकुरी, विविध शाळा तसेच ग्रामपंचायत शिंगणापूर ( ता. कोपरगाव) यांची व शासनाची फसवणूक केल्याचे पोलिसांनी सांगितले.

Ahmednagarlive24 Office